ॲड. गुरप्रीत सिंह चंडोक
महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटिज ॲक्ट
Maharashtra Prevention of Dangerous Activities Act समाजात शांतता राहावी यासाठी उपयोगात येणाऱ्या महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटिज ॲक्ट या कायद्याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया
प्रश्न- एमपीडीए कायदा म्हणजे काय?
उत्तर : एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटिज ॲक्ट, १९८१) हा समाजात शांतता, सुव्यवस्था व सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक स्थानबद्ध करण्यासाठी तयार करण्यात आलेला विशेष कायदा आहे.
प्रश्न- एमपीडीए कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे?
उत्तर : धोकादायक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून होणारे गुन्हे रोखणे, सार्वजनिक सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचे संरक्षण करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
प्रश्न-. एमपीडीएअंतर्गत कोणत्या प्रकारच्या व्यक्तींवर कारवाई करता येते?
उत्तर : अवैध दारू विक्रेते, ड्रग ऑफेंडर, धोकादायक व्यक्ती, स्लमलॉर्ड, व्हिडीओ पायरट, वाळू माफिया, काळाबाजार करणारे, सायबर गुन्हेगार (सुधारणांनुसार), लैंगिक गुन्हे करणारे गंभीर आरोपी
प्रश्न-. एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धता म्हणजे काय?
उत्तर : एखाद्या व्यक्तीने भविष्यात गुन्हे करू नयेत म्हणून न्यायालयीन खटला पूर्ण होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक स्वरूपात तुरुंगात ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे स्थानबद्धता.
प्रश्न-. एमपीडीए हा दंडात्मक की प्रतिबंधात्मक कायदा आहे?
उत्तर : हा पूर्णपणे प्रतिबंधात्मक स्वरूपाचा कायदा आहे.
प्रश्न-. एमपीडीए प्रस्ताव कोण तयार करतो?
उत्तर : संबंधित पोलिस ठाणे प्रस्ताव तयार करून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्तांकडे पाठवते.
प्रश्न-. एमपीडीएअंतर्गत आदेश कोण काढू शकतो?
उत्तर : जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, राज्य शासनाच्या अधिकारानुसार स्थानबद्धतेचा आदेश जारी करू शकतात. एमपीडीएसाठी पब्लिक ऑर्डरला धोका सिद्ध होणे आवश्यक असते.
प्रश्न-. गुप्त साक्षीदारांचे महत्त्व काय असते?
उत्तर : लोक आरोपीच्या भीतीमुळे उघडपणे तक्रार देत नसल्यास त्यांचे गोपनीय जबाब नोंदवले जातात. एमपीडीए प्रस्तावात हे महत्त्वाचे पुरावे मानले जातात.
प्रश्न-. एमपीडीएअंतर्गत व्यक्तीला किती काळ स्थानबद्ध करता येते?
उत्तर : कमाल १२ महिन्यांपर्यंत स्थानबद्ध करता येते.
प्रश्न- स्थानबद्ध व्यक्तीला कारणे कधी कळवावी लागतात?
उत्तर : अटकेनंतर शक्य तितक्या लवकर आणि साधारणतः ५ दिवसांच्या आत स्थानबद्धतेची कारणे कळवावी लागतात.
प्रश्न-. एमपीडीएअंतर्गत अटक झालेल्या व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे का?
उत्तर : होय. संबंधित व्यक्तीला राज्य शासनाकडे किंवा सल्लागार मंडळाकडे प्रतिनिधित्व सादर करण्याचा अधिकार असतो
प्रश्न- एमपीडीए आदेशाला आव्हान कुठे देता येते?
उत्तर : मुंबई उच्च न्यायालयात (कलम 226 अंतर्गत)
सर्वोच्च न्यायालयात (कलम 32 अंतर्गत) व याचिकेद्वारे आदेशाला आव्हान देता येते.