वाईट दिवस कधी येतील ते सांगता येत नाही

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
कोल्हापूर
Manoj Jarange Patil मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात आज छत्रपती शाहू महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 

Manoj Jarange Patil 
पत्रकार परिषदेदरम्यान शाहू महाराज यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट केले की, जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नाही. दोन्ही बाजूंमध्ये समन्वय कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले. कोल्हापूर गॅझेटच्या अंमलबजावणीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शाहू महाराज यांनी सांगितले की, हा विषय आता जरांगे पाटील यांनी गंभीरपणे घेतला आहे आणि कोल्हापूरकरांनीही यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करताना पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले. पश्चिम महाराष्ट्राचा मध्यभाग कुठे येतो याचा आढावा घेत मोठ्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित केला जाईल, असे ते म्हणाले. तसेच दुसऱ्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व संबंधित गॅझेट्सची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. सातारा संस्थान संदर्भात एक महिन्याचा अवधी घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
पश्चिम महाराष्ट्राच्या Manoj Jarange Patil  सामाजिक-आर्थिक स्थितीवर भाष्य करताना जरांगे पाटील यांनी या भागातील बांधवांना आवाहन केले की, आपल्या पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी पुढे येऊन संघर्ष करणे गरजेचे आहे. “पश्चिम महाराष्ट्र सधन आहे असे वारंवार सांगून आपल्याला दुर्लक्षित केले जाऊ शकते, त्यामुळे जागरूक राहणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. शिक्षण आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ऊस व फळबागांच्या उत्पन्नावर अवलंबून राहण्याऐवजी उच्च शिक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.आजच्या परिस्थितीत भविष्यातील अनिश्चितता लक्षात घेणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी समाजाला सजग राहण्याचे आवाहन केले.“आज सगळं आहे. पण वाईट दिवस कधी येतील ते सांगता येत नाही. तुमच्याकडे भरपूर आहे. आम्ही पाटील लगेच फुगतो. लोक आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगायला शिकवतातत. आज तुम्ही जितके श्रीमंत आहात, उद्या तुमची मुलं अधिकारी झाली तर अजून श्रीमंत व्हालं” असं जरांगे पाटील यांनी सांगितलं..पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती भागात मोठ्या आंदोलनात्मक कार्यक्रमाचे संकेत देताना, “तेथे एकही मराठा घरात राहू नये,” असे आवाहनही त्यांनी उपस्थितांसमोर केले. या भेटीमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रात नव्याने गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.