नवी दिल्ली,
Mithali Raj and Sana Mir photos महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत शानदार सुरुवात केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने सर्व विभागांत सरस कामगिरी करत पाकिस्तानला ६४ धावांनी पराभूत केले. मात्र सामन्याच्या निकालाइतकीच चर्चा सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर घडलेल्या एका अनोख्या प्रसंगाची रंगली.सामन्यापूर्वी विश्वचषक ट्रॉफीच्या अनावरणासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारताच्या माजी कर्णधार मिताली राज आणि पाकिस्तानच्या माजी कर्णधार सना मीर यांना निमंत्रित केले होते. दोन्ही दिग्गजांनी एकत्रितपणे ट्रॉफीचे अनावरण केले आणि त्यानंतर ट्रॉफीसोबत छायाचित्रांसाठीही एकत्र उभ्या राहिल्या. भारत-पाकिस्तान सामन्यांभोवती असणाऱ्या तणावपूर्ण वातावरणामुळे हे दृश्य अनेकांसाठी आश्चर्याचा विषय ठरले.

सामन्यादरम्यान मात्र भारतीय संघाने आपली भूमिका कायम ठेवत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. अलीकडच्या काळात भारत-पाकिस्तान सामन्यांनंतर भारतीय संघाने 'नो हँडशेक' धोरण स्वीकारल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यामुळे मैदानावरील या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ट्रॉफी अनावरण कार्यक्रमातील मिताली राज आणि सना मीर यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनली.तथापि, ट्रॉफी सादरीकरण हा आयसीसीच्या अधिकृत कार्यक्रमाचा भाग असल्याने त्यामध्ये सहभागी होणाऱ्या माजी खेळाडूंची निवड आयसीसीकडून केली जाते. त्यामुळे या कार्यक्रमाचा संबंध कोणत्याही संघाच्या धोरणाशी किंवा वैयक्तिक भूमिकांशी जोडला जाऊ शकत नाही. दरम्यान, मैदानावरील कामगिरीत भारताने पाकिस्तानवर पूर्ण वर्चस्व गाजवत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. मात्र सामन्यानंतर सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली ती ट्रॉफीसोबत एकत्र दिसलेल्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंच्या फोटोची. कट्टर प्रतिस्पर्धी देशांच्या प्रतिनिधी असलेल्या या दोघी एका मंचावर दिसल्याने अनेक क्रिकेटप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी क्रीडाभावनेचे ते सुंदर उदाहरण असल्याचे मत मांडले.