नागपूर,
MNLU Nagpur महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एमएनएलयू), नागपूर येथील पीएचडी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आरक्षणाच्या नियमांचे पालन न केल्याच्या आरोपांनंतर आता विद्यापीठाने राखीव प्रवर्गातील १९ रिक्त जागांसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने एकाच शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या दोन स्वतंत्र तुकड्या (बॅच) तयार होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- खुल्या प्रवर्गाची बॅच सुरू असताना नव्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा
विद्यापीठाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी पीएचडी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरू केले आहे. मात्र, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), ओबीसी, एसईबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी राखीव असलेल्या १९ रिक्त जागांसाठी नव्याने अर्ज मागविण्यात आले आहेत. या जागांसाठी १९ जुलै रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे.
फेब्रुवारीमध्ये जाहीर झालेल्या अंतिम निवड यादीत आरक्षणाचे नियम पाळले गेले नसल्याचा आरोप करण्यात आला होता. सुरुवातीला ३५ जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत विविध राखीव प्रवर्गांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, अंतिम निवड यादीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि एसईबीसी प्रवर्गातील एकाही उमेदवाराला प्रवेश मिळाला नसल्याचा दावा करण्यात आला.याशिवाय, खुल्या प्रवर्गासाठी मंजूर १२ जागांच्या तुलनेत २२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने विद्यापीठाला नोटीस बजावली होती.
न्यायालयातही पोहोचले प्रकरण
पीएचडी प्रवेशासाठी इच्छुक असलेले दीपक खरात यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर न्यायालयाने विद्यापीठाला नियमांनुसार प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर संबंधित उमेदवाराला प्रवेश देण्यात आला.
प्रवेश प्रक्रियेदरम्यान MNLU Nagpur मुलाखत आणि मूल्यांकनासाठी ५० टक्के गुणांची अट पूर्वसूचना न देता लागू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे अनेक पात्र उमेदवारांना अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.विद्यापीठ प्रशासनाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. पीएचडी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि आरक्षणाच्या नियमांनुसारच राबविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला जात आहे. काही प्रवर्गांमध्ये पात्र उमेदवार उपलब्ध नसल्याने जागा रिक्त राहिल्या असून, त्याच जागा भरण्यासाठी नव्याने जाहिरात काढण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.दरम्यान, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची पीएचडी बॅच आधीच सुरू झाली असताना राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नंतर प्रवेश दिला जाणार असल्याने एकाच शैक्षणिक वर्षात वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र तुकड्या तयार होतील का, याबाबत शैक्षणिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. आरक्षण, प्रतिनिधित्व आणि प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.