मुंबई.
Monsoon breaks due to hot winds महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आणखी लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे हवामान विभाग आणि भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी आणखी सुमारे ५ ते ६ दिवसांचा विलंब होऊ शकतो. त्यामुळे मुंबईसह अनेक भागांना पावसासाठी २० जूनपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर भारतातून वाहणारे गरम आणि कोरडे वारे मान्सूनच्या पुढील प्रवासात अडथळा ठरत आहेत. त्यामुळे मान्सून मध्य भारतातच थांबला असून महाराष्ट्रात त्याची गती मंदावली आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात तापमान पुन्हा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, उष्णतेचा तडाखा वाढताना दिसत आहे. पुढील २४ ते ४८ तासांत काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.दरम्यान, मान्सूनने देशातील हैदराबाद, ओडिशा किनारपट्टी, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये पोहचला असला तरी महाराष्ट्रात मात्र तो अद्याप स्थिर झालेला नाही. काही ठिकाणी वादळी पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी मान्सूनचे नियमित आगमन अजूनही प्रतीक्षेत आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुकूल हवामान तयार झाल्यानंतरच मान्सूनची पुढील वाटचाल वेग घेईल. तोपर्यंत राज्यात उष्णतेचा त्रास कायम राहण्याची शक्यता आहे.