अनिल कांबळे
नागपूर,
MD drug गेल्या काही महिन्यांपासून शहरात ड्रग्ज आणि गांजाची तस्करी वाढली आहे. अमली पदार्थांच्या व्यापारावर लगाम घालण्यासाठी क्राइम ब्रँचच्या एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई करत ६५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह चार आरोपींना अटक केली. आरोपींकडून अमली पदार्थ, मोबाईल फोन आणि दोन अॅक्टिव्हा दुचाकी असा एकूण ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पीयूष मारोतराव मलवंडे (३०), राहुल संजय गोराडे (३६), आर्य श्यामकुमार गोरेले (२३) आणि मनीष सुनील दुर्वे अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. तर या आरोपींना ड्रग्ज पुरविणारा प्रतिक किंदरले हा अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ६ वाजता बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरहरी नगर येथील वास्तू रेसिडेन्सीसमोर एनडीपीएस पथक गस्त घालत होते. यावेळी दोन अॅक्टिव्हा दुचाकींजवळ चार युवक संशयास्पदरित्या उभे असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली. झडतीदरम्यान आरोपींकडून ६५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर, चार मोबाईल फोन आणि दोन अॅक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे ८.८० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात मुख्य आरोपी पीयूष मलवंडे याने फरार आरोपी प्रतीक किंदरले याच्याकडून एमडी ड्रग्ज खरेदी केल्याचे उघड झाले आहे. तसेच राहुल, आर्य आणि मनीष हे अमली पदार्थ खरेदी करण्याच्या उद्देशाने त्याच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड
पोलिस तपासात अटक आरोपींचा MD drug गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. मुख्य आरोपी पीयूष मलवंडे याच्याविरुद्ध वाडी पोलिस ठाण्यात शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. राहुल गोराडे याच्यावर यापूर्वी एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे. आर्य गोरेले याच्यावर मारहाण आणि शस्त्र कायद्यासह तीन गुन्हे नोंद आहेत, तर मनीष दुर्वे याच्याविरुद्ध शरीरावरील गुन्हे आणि शस्त्र कायद्यांतर्गत दोन प्रकरणे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एमडी ड्रग्जचा पुरवठा करणारा फरार आरोपी प्रतीक किंदरले याच्या शोधासाठी प्रयत्न सुरु आहेत.