'राजकीय राडा' उपमुख्यमंत्र्यांचे पत्रिकेतून नाव ‘गायब’

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
नवी मुंबई
Eknath Shinde नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्यविषयक सुविधांच्या उद्घाटन सोहळ्यावरून आज शहरात राजकीय तणाव निर्माण झाला. या कार्यक्रमाच्या अधिकृत पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याने शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन छेडले. कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
 

Eknath Shinde  
या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी गणेश नाईक उपस्थित असताना बाहेर शिवसेना (शिंदे गट) समर्थक कार्यकर्त्यांनी जमाव करून घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. संबंधित प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.शिवसेना नेते विजय माने यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील महत्त्वाचे नेते असून त्यांना डावलणे हे अयोग्य आहे. तसेच, कार्यक्रमाची रचना आणि निमंत्रण याबाबत प्रशासनाने योग्य समन्वय साधला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोग्य सुविधांसाठी निधी मिळवण्यात शिंदे यांचे योगदान असल्याचा दावा करत त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा देत दुपारी प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे सांगितले. परिस्थिती अशाच प्रकारे पुन्हा घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 
 
दरम्यान, कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले असून त्यात वनमंत्री गणेश नाईक, खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची नावे नमूद आहेत. या संदर्भात विचारले असता गणेश नाईक यांनी “मला त्याची कल्पना नाही, याबाबत महापालिका आयुक्तांना विचारावे” असे सांगत प्रतिक्रिया टाळली.
या घटनेमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून महापालिका प्रशासनाच्या समन्वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुढील काही तासांत परिस्थिती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.