एनसीईआरटीच्या पुस्तकात सिंधू संस्कृतीशी छेडछाड!

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
NCERT's Indus Valley Civilization राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या कला शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या इयत्ता नववीच्या ‘मधुरिमा’ या पुस्तकात सिंधू संस्कृतीचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध ‘नृत्यांगना’ मूर्तीचे सादरीकरण बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बदलामुळे इतिहास, कला आणि सांस्कृतिक वारशाच्या सादरीकरणाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
 
 
dance

नव्या पुस्तकात बदल का ?
पाठ्यपुस्तकातील ‘कलांचा इतिहास’ या प्रकरणात मोहेंजो-दडो येथे सापडलेल्या कांस्य नृत्यांगना मूर्तीचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे. मात्र, या छायाचित्रात मूर्तीच्या धडाचा काही भाग सावलीच्या स्वरूपात झाकलेला दिसत असल्याने तिच्या मूळ स्वरूपात बदल करण्यात आल्याची टीका होत आहे. इतिहासकार आणि कला अभ्यासकांच्या मते, यामुळे विद्यार्थ्यांसमोर मूर्तीचे वास्तविक स्वरूप न येता बदललेली प्रतिमा सादर केली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दशकांपासून हीच मूर्ती एनसीईआरटीच्या विविध पाठ्यपुस्तकांमध्ये मूळ स्वरूपात प्रसिद्ध होत होती. त्यामुळे नव्या पुस्तकातील बदलाकडे अनेकांनी गंभीरतेने पाहिले आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात जतन करण्यात आलेली ही मूर्ती सिंधू संस्कृतीच्या कलात्मक आणि धातुकाम कौशल्याचे प्रतीक मानली जाते.
या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना काही इतिहासकारांनी मूर्तीचे स्वरूप बदलणे हे इतिहासाचे अचूक सादरीकरण नसल्याचे मत व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांना मूळ कलाकृतीऐवजी बदललेली प्रतिमा दाखवणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अशा प्रकारच्या बदलांमुळे ऐतिहासिक वारशाबाबत चुकीची समज निर्माण होऊ शकते, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, एनसीईआरटीने या आरोपांना फारसे महत्त्व देण्यास नकार दिला आहे. संस्थेच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही विशिष्ट हेतूने प्रतिमा बदलण्यात आल्याचा दावा फेटाळून लावत संबंधित पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्या तज्ज्ञ समितीकडे अधिक माहिती असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे शैक्षणिक साहित्यामध्ये इतिहास आणि कलेचे सादरीकरण कसे असावे, यावर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना मूळ ऐतिहासिक वारसा दाखवावा की काही बदलांसह सादर करावा, हा प्रश्न आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.