सवलतीत प्रवास करायचाय? लगेच काढा NCMC स्मार्ट कार्ड!

1 ऑगस्टपासून नवीन नियम लागू

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
मुंबई
NCMC Smart Card महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि डिजिटल व्यवहारांना चालना देणे या उद्देशाने 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड असणे आवश्यक ठरणार असून कार्ड नसल्यास त्यांना पूर्ण भाडे आकारले जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
 

NCMC Smart Card 
राज्यात या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी 4 हजारांहून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. एसटी बस डेपो, नियंत्रण केंद्रे तसेच अधिकृत एजंट यांच्या माध्यमातून ही नोंदणी आणि वितरण प्रक्रिया राबवली जात आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे, यासाठी ही व्यवस्था उभारण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या NCMC Smart Card माध्यमातून सवलतीचे तिकीट थेट कार्ड वॉलेटमधून दिले जाणार असून या वॉलेटमध्ये रोख रक्कम किंवा यूपीआयद्वारे टॉपअप करण्याची सुविधा उपलब्ध असेल. कार्ड मिळवण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी नोंदणी करणे आवश्यक असून त्यानंतर सुमारे 30 दिवसांच्या आत कार्ड वितरित केले जाईल. नवीन स्मार्ट कार्डसाठी 199 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.महिला प्रवाशांसाठी आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्ड, विद्यार्थ्यांसाठी सरल क्रमांक तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी वैध ओळखपत्र अशी कागदपत्रे आवश्यक राहणार आहेत. या प्रणालीमुळे सवलतींचा लाभ अधिक पारदर्शक पद्धतीने मिळेल तसेच तिकीट वितरण प्रक्रियेत आधुनिकता येईल, असा दावा एसटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नसल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे एसटीच्या प्रवासी सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी डिजिटल प्रणाली अधिक बळकट होणार असून प्रवाशांनी 1 ऑगस्टपूर्वी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड मिळवून ते कार्यान्वित करून घ्यावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.