चिमुकलीच्या अवयवदानातून समाजापुढे आदर्श

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Akanksha Bansod केवळ सहा वर्षांच्या चिमुकलीच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवून स्वत:ला सावरत तिच्या आई-वडिलांनी मेंदूमृत चिमुकलीचे अवयवदान करत माणुसकीचे दर्शन घडविले आणि समाजापुढे आदर्श ठेवला.
 

organ donation story Akanksha Bansod 
आकांक्षा बन्सोड (रा. खापरी) हे या चिमुकलीचे नाव. ८ जूनला घरी खेळत असताना पायात दोरी अडकल्यामुळे ती खाली पडली व तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुर होते. आवश्यक वैद्यकीय तपासणीत तिचा मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. त्यादृष्टीने उपचार सुरू होते. तिची प्रकृती न्यूरोलॉजिकलदृष्ट्या अत्यंत खालावली. डॉक्टरांनी उपचारांची शर्थ केली. मात्र, तेथील डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. सुचेता मेश्राम, डॉ. महेंद्र चव्हाण, डॉ. हिमाली मेश्राम यांनी विविध वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालावरून तिला मेंदूमृत घोषित केले.
 
 
तिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवरAkanksha Bansod  दु:खाचा डोंगर कोसळला. तिचे वडील महादेव, आई मीना व कुटुंबीयांना शोकावेग आ‌वरत नव्हता. त्यांना धीर देत एम्सचे प्रत्यारोपण समन्वयक गजानन गिते, दिव्या गायगोले यांनी सांत्वन करीत अवयवदानाविषयी समुपदेशन केले. तिच्या आई-वडिलांनी काळजावर दगड ठेवत समाजहिताचा विचार करून यकृ त व दोन्ही मूत्रपिंडदानास संमती दिली. एम्सच्या सूचनेनंतर क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. मनीष श्रीगिरीवार, सचिव डॉ. शैलेश गहुकर यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक दिनेश मंडपे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया केली. प्रतीक्षा यादीच्या आधारे अवयवांचे योग्य वाटप केले. यकृतदानास मंजुरी मिळाली असली तरी सुयोग्य दाता मिळाला नाही. दोन्ही मूत्रपिंड एम्समधील १४ वर्षांच्या रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आले. आकांक्षाच्या पार्थिवास एम्सच्या कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली. पार्थिव तिच्या घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका नि:शुल्क उपलब्ध करून दिली.