व्हीपीएलचा मानकरी पगारिया स्ट्रायकर्स

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
Pagariya Strikers: VPL Champions पगारिया स्ट्रायकर्सने थरारक अंतिम सामन्यात भारत रेंजर्सचा ८ धावांनी पराभव केला. सलामीवीर फैज शेख, रविकुमार समर्थ आणि कर्णधार यश कदम यांच्या वादळी अर्धशतकांनंतर गोलंदाज संस्कार चवटे आणि कौस्तुभ साळवे यांनी केलेल्या संयमी गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळविला. पगारिया स्ट्रायकर्सने विदर्भ प्रीमियर लीगच्या (व्हीपीएल) दुसऱ्या हंगामाचे विजेतेपद पटकावले.
 
 
pagaria
 
व्हीसीए जामठा स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत भारत रेंजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गतवर्षीच्या उपविजेत्या पगारिया स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करताना ३ गड्यांच्या मोबदल्यात २४९ धावा केल्या. फैज शेखच्या ७० धावा (४८ चेंडू, ८ चौकार, २ षटकार), रविकुमार समर्थच्या नाबाद ९० धावा (४७ चेंड, ८ चौकार, ४ षटकार) आणि सामनावीर ठरलेल्या कर्णधार यश कदमच्या नाबाद ७३ धावांच्या (केवळ १९ चेंडूंत ४ चौकार आणि ९ षटकार) वादळी खेळीने रेंजर्सच्या गोलंदाजांना कुठलीही संधी दिली नाही. रेंजर्सचा वेगवान गोलंदाज नचिकेत भुतेने ३६ धावांत २ बळी घेतले. थरारक अंतिम सामन्यात पगारिया स्ट्रायकर्सने भारत रेंजर्सवर ८ धावांनी मात केली.
 
स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या ३० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रेंजर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. ५२ धावांवर त्यांनी ४ गडी गमावले होते. मात्र, त्यानंतर मनन अग्रवाल (६७ धावा) आणि जगजोत सासन (३७ धावा) यांनी पाचव्या गड्यासाठी ३६ चेंडूंत ६३ धावांची भागीदारी करीत संघाची धावसंख्या ११५ पर्यंत पोहोचवली. सासन बाद झाल्यानंतर अग्रवाल आणि वरुण बिश्त (५६ धावा) यांनी सूत्रे हाती घेत केवळ ३९ चेंडूंत १०१ धावांची शतकी भागीदारी करून सामन्यात पुन्हा चुरस निर्माण केली. मात्र, हे दोघे लागोपाठ चेंडूंवर बाद झाल्यामुळे रेंजर्सच्या आशांना मोठा धक्का पोहोचला.
 
बक्षिसांची लूट
व्हीपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष प्रशांत वैद्य आणि इतर सदस्यांसहित विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे (व्हीसीए) अध्यक्ष विनय देशपांडे (मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश), सचिव संजय बडकस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या पगारिया स्ट्रायकर्स संघाला चषक आणि ३५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तर, उपविजेत्या भारत रेंजर्स संघाला २५ लाख रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरलेला पगारिया स्ट्रायकर्सचा फलंदाज आर. समर्थने (४५९ धावा) ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले, तर ऑरेंज टायगर्सचा वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरे याने (२० बळी) पर्पल कॅप पटकावण्याचा बहुमान मिळवला. भारत रेंजर्सला २० षटकांत ८ बाद २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. स्ट्रायकर्सकडून चवटे आणि साळवे यांनी प्रत्येकी २ महत्त्वपूर्ण बळी टिपले.