तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला...आत्महत्येचे दोन प्रयत्न फसले

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
मुंबई
knife attack case पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा 27 वर्षीय स्नेहल सावंत नावाच्या तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपी अमोल मुळे याला अखेर पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अटक केली आहे.हल्ल्यानंतर आरोपीने पोलिसांपासून बचाव करण्यासाठी लपून बसण्याचा प्रयत्न केला.मात्र,पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या.
 

knife attack case 
मिळालेल्या माहितीनुसार,हल्ल्यानंतर आरोपी अमोल मुळे हा केळवा बीच परिसरात गेला होता.तेथे त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र,गळफासासाठी वापरलेली दोरी तुटल्याने तो बचावला.त्यानंतरही त्याने कथितरित्या विष प्राशन करून आत्महत्येचा दुसरा प्रयत्न केला.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.दरम्यान,पालघरच्या वरखुंटी परिसरातील एका वाडीत संशयास्पद अवस्थेत एक व्यक्ती बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीची तत्काळ दखल घेत पालघर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता तोच कोयता हल्ला प्रकरणातील फरार आरोपी अमोल मुळे असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
विष प्राशन केल्याने आरोपीची प्रकृती खालावलेली असल्याने त्याला तातडीने पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.आरोपीवर वैद्यकीय उपचार सुरू असून पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला ठेवण्यात आले आहे.
 
 
भरदिवसा घडलेल्या हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण
काही दिवसांपूर्वी पालघरच्या knife attack case  गोल्ड सिनेमा परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेत स्नेहल सावंत या तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले होते.भरदिवसा घडलेल्या या हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती.सध्या पालघर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून हल्ल्यामागील नेमके कारण,आरोपी आणि पीडितेतील संबंध तसेच हल्ल्याला कारणीभूत ठरलेली पार्श्वभूमी याबाबत चौकशी सुरू आहे.आरोपीची प्रकृती सुधारल्यानंतर त्याची अधिक कसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.