वर्धा,
pankaj-takone : वर्धा पोलिस दलातील पोलिस कर्मचारी तसेच राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट व्हॉलिबॉल खेळाडू पंकज टाकोणे यांची ३० जून ते १० जुलै दरम्यान शेंगलू (चीन) येथे आयोजित वर्ल्ड स्कूल गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय व्हॉलिबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
पोलिस सेवेत कार्यरत असताना क्रीडा क्षेत्रातही सातत्याने उल्लेखनीय योगदान देणार्या पंकज टाकोणे यांनी अथक परिश्रम, शिस्तबद्ध कार्यपद्धती, समर्पण आणि खेळावरील निष्ठेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे वर्धा पोलिस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पंकज टाकोणे यांच्या या उल्लेखनीय यशाचे श्रेय पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे तसेच वर्धा पोलिस दलाचे खेळ विभागप्रमुख राजेश उमरे यांना जाते. त्यांच्या निवडीबद्दल पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी, क्रीडाप्रेमी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.