अमेरिका-इराण शांतता कराराचे पंतप्रधान मोदींकडून स्वागत

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
PM Modi welcomes US-Iran peace अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता कराराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले असून, या निर्णयामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त केली आहे. या करारामुळे केवळ संबंधित देशांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिलासा मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, या संघर्षामुळे जागतिक पातळीवर गंभीर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून अनेक देशांना जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे हा करार सकारात्मक दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
 
 

US-Iran peace 
त्यांनी पुढे म्हटले की, या कराराच्या अंमलबजावणीनंतर प्रदेशात पुन्हा शांतता, स्थैर्य आणि मुक्त व्यापाराची प्रक्रिया सुरू होईल अशी भारताला अपेक्षा आहे. उर्वरित मुद्द्यांवर संवादाद्वारे तोडगा काढून कायमस्वरूपी समाधान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची घोषणा रविवारी केली होती. त्यांच्या माहितीनुसार, हा शांतता करार स्वित्झर्लंडमध्ये अधिकृतरीत्या स्वाक्षरी केला जाणार आहे, ज्यामध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या कराराअंतर्गत काही मुद्द्यांवर तात्पुरती शस्त्रसंधी ठेवून पुढील चर्चेला सुरुवात होणार आहे. या चर्चांमध्ये निर्बं, गोठवलेली आर्थिक मालमत्ता आणि अणुकार्यक्रम यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असेल. अंतिम करार होईपर्यंत सध्याची तात्पुरती व्यवस्था लागू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.