मुंबई,
Sanchita Ugale's suicide मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री संचिता उगले यांचे निधन झाले आहे. त्या अवघ्या ३० वर्षांच्या होत्या. मुंबईजवळील नालासोपारा परिसरातील त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता या आपल्या आई-वडील आणि लहान बहिणीसह राहत होत्या. घटनेच्या वेळी त्या घरी एकट्याच असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संचिता उगले यांनी दूरचित्रवाणी आणि चित्रपट क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘कुमकुम भाग्य’, ‘वागळे की दुनिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तसेच विकी कौशल अभिनीत ‘छावा’ चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली होती. त्यांच्या निधनानंतर सहकलाकार, चाहते आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असून त्यांच्या अकाली जाण्याबद्दल दुःख व्यक्त केले जात आहे. दरम्यान, त्यांच्या निधनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींकडून माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.