नागपूर,
Sanskrit and AI integration “एआय आणि संस्कृत यांच्यात समन्वय प्रस्थापित करणे हे आव्हानात्मक कार्य असले तरी आजच्या काळातील ती अत्यंत महत्त्वाची गरज आहे. भारताच्या ज्ञानपरंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी केले.
‘भारतकेंद्रित एआय’ समर स्कूल कार्यशाळेचा उत्साहात शुभारंभ
सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आणि इम्मवर्स इनोवेशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बिल्डिंग सिव्हिलायझेशनल एआय फ्रॉम भारत’ या २१ दिवसीय समर स्कूल कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रा. पंकज चांदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.प्रमुख अतिथी प्रा. पंकज चांदे यांनी भारताच्या प्राचीन ज्ञानसंपदेचे डिजिटल जतन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी एकत्रीकरण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. “कृत्रिम बुद्धिमत्ता जगाचे भविष्य घडवत असताना भारताचे शास्त्र, भाषा आणि बौद्धिक वारसा यांनाही या नवयुगाचा अविभाज्य भाग बनले पाहिजे,” असे ते म्हणाले.
आर. रामकृष्णन यांनी भारताच्या भाषिक, सांस्कृतिक आणि ज्ञानपरंपरागत विविधतेचे अचूक आकलन करणारा ‘सिव्हिलायझेशनल एआय’ विकसित करण्याचे ध्येय स्पष्ट केले. कार्यशाळेत भारतीय ज्ञान प्रणाली, ग्रंथांचे डिजिटायझेशन, भाषा तंत्रज्ञान, मशीन लर्निंग आणि एआय-आधारित नवोपक्रम यांवर प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.१५ जूनपासून सुरू झालेली ही कार्यशाळा ५ जुलैपर्यंत चालणार असून देशातील २३ नामांकित उच्च शिक्षण संस्थांमधून निवडलेल्या ३० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ यांसह विविध संस्थांतील विद्यार्थी संस्कृत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांमधील परस्परसंबंधांचा सखोल अभ्यास करणार आहेत.