Shani Dev will be retrograde वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्माचे फळ देणारा आणि न्यायाचा ग्रह मानले जाते. त्यामुळे शनिच्या राशीबदलासोबतच त्यांच्या चालातील बदलांनाही विशेष महत्त्व दिले जाते. २७ जुलै २०२६ रोजी शनि वक्री होणार असून या बदलाचा प्रभाव अनेक राशींच्या जीवनावर जाणवू शकतो. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, शनिची वक्री चाल व्यक्तीच्या कर्मानुसार परिणाम घडवते आणि त्यामुळे करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब तसेच वैयक्तिक आयुष्यावर त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून येऊ शकतात.सध्या मेष, कुंभ आणि मीन राशींवर शनिची साडेसाती सुरू आहे, तर सिंह आणि धनु राशींवर ढैय्याचा प्रभाव कायम आहे. अशा परिस्थितीत शनिच्या वक्री गतीकडे या राशींच्या लोकांचे विशेष लक्ष लागले आहे.

- मेष राशीच्या व्यक्तींना या काळात संमिश्र अनुभव येण्याची शक्यता आहे. अचानक खर्च वाढू शकतो आणि आर्थिक बाबतीत अधिक सावधगिरी बाळगावी लागू शकते. मात्र, नोकरी किंवा करिअरच्या दृष्टीने काही चांगल्या संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन जबाबदाऱ्या आणि महत्त्वाच्या संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात.
- सिंह राशीच्या लोकांसाठी हा कालावधी काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता असून वैयक्तिक आयुष्यातही काही अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना संयम आणि विचारपूर्वक पावले उचलणे गरजेचे ठरणार आहे.
- धनु राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. या काळात मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहणे आणि पैशांशी संबंधित निर्णय घाईघाईत न घेणे योग्य ठरेल. संयम आणि नियोजन या दोन गोष्टींवर भर दिल्यास संभाव्य अडचणी टाळता येऊ शकतात.
- कुंभ राशीच्या लोकांसाठी मात्र ही वक्री चाल तुलनेने सकारात्मक परिणाम देणारी ठरू शकते. साडेसातीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या या राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्य, करिअरमधील प्रगती आणि रखडलेली कामे मार्गी लागण्याचे संकेत काही ज्योतिषतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.