बर्मिंगहॅम,
ind-vs-pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला टी-२० विश्वचषक २०२६ चा सहावा सामना बर्मिंगहॅम येथे खेळला जात आहे. या सामन्यात, टीम इंडियाच्या स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांनी ६३ चेंडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाने कोणत्याही विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे. हरमनप्रीत आणि मंधाना यांनी मिळून या सामन्यात एक नवीन विक्रम रचला. मंधानाने अर्धशतक झळकावले, तर हरमनप्रीत कौर संथ खेळी करून बाद झाली.
मंधाना आणि हरमनप्रीत यांच्यातील ९३ धावांची भागीदारी
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी अवघ्या १८ धावांत दोन विकेट गमावल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर फलंदाजीसाठी आली आणि स्मृती मंधानासोबत तिने संघाला सावरले. त्यांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची शानदार भागीदारी करून भारताला संकटातून बाहेर काढले. पाकिस्तानविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने कोणत्याही विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी हा विक्रम शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या नावावर होता, ज्यांनी २०२४ मध्ये पहिल्या विकेटसाठी ८५ धावा जोडल्या होत्या.
स्मृती मंधानाने ६८ धावांची शानदार खेळी केली
स्मृती मंधानाने पाकिस्तानविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ६८ धावांची शानदार खेळी केली. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारतीय महिला खेळाडूने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. तिच्या आधी, मिताली राजने २०१६ मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद ७३ धावांची सर्वोच्च खेळी केली होती. मंधानाच्या ६८ धावांनी भारतीय संघाला एक मजबूत धावसंख्या उभारण्यास मदत केली.
मंधानानंतर रिचा घोषने वेगवान धावा केल्या
स्मृती मंधाना या सामन्यात शानदार फलंदाजी केली. तिने ४४ चेंडूंमध्ये ६८ धावांची खेळी केली आणि यामध्ये ९ चौकार आणि २ षटकार मारण्यात ती यशस्वी ठरली. तिच्याशिवाय, हरमनप्रीत कौरने ३६ धावा आणि रिचा घोषने १७ चेंडूंमध्ये ३४ धावांचे योगदान दिले. याशिवाय, भारतीय संघाचे उर्वरित फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानला १७१ धावा कराव्या लागतील. या सामन्यात पाकिस्तानकडून सादिया इक्बाल आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.