लंडन,
Social media ban for under-16s in Britain ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी देशात १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया अॅप्स वापरण्यावर बंदी घालण्याची मोठी घोषणा केली आहे. लंडनमधील १० डाउनिंग स्ट्रीट येथून बोलताना त्यांनी स्पष्ट केले की मुलांचे मानसिक आरोग्य, सुरक्षितता आणि आनंद यांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.कीर स्टारमर यांनी सांगितले की, अनेक पालकांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय अधिक ठोस करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या अति वापरामुळे मुलांमध्ये व्यसन वाढत असून, त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यास, झोप, खेळ आणि कौटुंबिक जीवनावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सतत स्क्रोलिंगमुळे मानसिक तणाव वाढतो आणि मुलांचे आरोग्य बिघडते, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी मान्य केले की हा नियम लागू करणे सोपे नसणार आहे, कारण यामध्ये जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचा सहभाग आहे. मात्र मुलांचे हित सर्वात महत्त्वाचे असल्याने सरकार कठोर भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ संदेशातही त्यांनी पुन्हा सांगितले की, पालकांकडून मिळालेला प्रतिसाद स्पष्ट होता आणि अनेकांनी सोशल मीडियाच्या व्यसनाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळेच सरकारने हा निर्णायक पाऊल उचलले आहे.