आठ जणांचा बुडून मृत्यू कठोर कारवाई केली जाईल

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
सोलापूर
Solapur accident  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात म्हसवड–पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात घडला. भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याने आठ जणांचा बुडून मृत्यू झाला असून काही जणांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Solapur accident, Malshiras road accident, Pandharpur Mhaswad road accident, 
मिळालेल्या माहितीनुसार, या पिकअप वाहनात एकूण १५ जण प्रवास करत होते. वाहन अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत विहिरीत उतरून बचावकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही जणांचे प्राण वाचवता आले, मात्र आठ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
घटनेनंतर मृतदेह पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून जखमींवरही तिथेच उपचार सुरू आहेत. रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला असून वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल घेत सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींना संरक्षक भिंत नसणे ही गंभीर बाब आहे आणि याबाबत जबाबदारी निश्चित केली जाईल. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या कडेला असलेल्या विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच स्पष्ट केले की, खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे अत्यंत धोकादायक असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी प्रशासन आणि ठेकेदारांवर गंभीर आरोप केले आहेत. रस्त्याचे काम करताना योग्य सर्वेक्षण झाले नसल्याचा दावा करत त्यांनी MSRDC आणि संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हा रस्ता धोकादायक असून त्याची पुन्हा तपासणी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून विधानसभेतही हा मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरूच आहे. दरम्यान, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.