शिर्डीतील प्रशिक्षण शिबिरात मिळवले यश
पांढरकवडा,
State Wushu Punch Exam ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन व वुशू असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने, अहमदनगर जिल्हा अमेच्युअर वुशू असोसिएशनच्या वतीने शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेले राज्यस्तर वुशू पंच प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात पांढरकवडा व यवतमाळ जिल्ह्यातील 9 वुशू प्रशिक्षकांनी घवघवीत यश संपादन करत ‘राज्यस्तर पंच’ म्हणून बहुमान मिळवला. शिर्डी येथे 12 ते 15 जून हे निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातून 150 नामांकित वुशू प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता. जिल्हा वुशू असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आनंद भुसारी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील 9 प्रशिक्षक या शिबिरात सहभागी झाले होते.
शिबिराच्या समारोपप्रसंगी अत्यंत कठीण समजली जाणारी वुशू पंच परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच प्रशिक्षकांनी उत्कृष्ट गुणांची टक्केवारी मिळवून यश संपादन केले. येथील हफिस शेख, योगेश पडोळे, हितेश नागभीडकर, नितेश पाली, विकास शेळके, रोहित काळे, ओम भारसाकळे, संध्या आत्राम व आर्यन जाधव या नऊही प्रशिक्षकांची अधिकृतपणे राज्यस्तर वुशू पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर उंचावणाèया या नवनियुक्त पंचांना मार्गदर्शन करणारे डॉ. आनंद भुसारी यांचे क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष कौतुक होत आहे. या सर्व पंचांच्या निवडीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील वुशू खेळाला आता अधिक तांत्रिक व दर्जेदार बळ मिळणार असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.