गोंदिया,
stop-diarrhea : बालकांमधील अतिसाराचे प्रमाण रोखण्यासाठी आणि बालमृत्यू दरात घट करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात 16 जून ते 31 जुल या कालावधीत ‘स्टॉप डायरिया’ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील 82 हजार 824 बालकांना ओआरएस आणि झिंकच्या गोळ्यांचे वाटप करून सुरक्षा कवच दिले जाणार आहे.
पावसाळ्याच्या दिवसात लहान बालकांना अतिसार व विविध आजार होण्याची दाट शक्यता असते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. आजघडीला आरोग्य संस्थांमध्ये 91 हजार 858 ओआरएस पाकिटे, 1 लाख 60 हजार 800 झिंकच्या गोळ्या आणि 3 हजार 887 झिंक सिरपची उपलब्धता करून देण्यात आली आहे. तर आशा सेविका यांच्या मार्फत प्रत्येक घरात जाऊन 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार पुरवला जाणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील 1 हजार 292 कार्यरत आशा स्वयंसेविकांच्या मदतीने ही मोहीम प्रत्यक्ष गावपातळीवर राबवली जाणार असून मोहिमेदरम्यान 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी, प्रत्यक्ष हात धुण्याचे प्रशिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे.
66 हजारावर कुटुंबांपर्यंत पोहोचणार आरोग्य यंत्रणा...
मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील 1 हजार 878 अंगणवाड्या आणि 1 हजार 165 जिल्हा परिषद शाळांमधील बालकांचे सविस्तर सर्वेक्षण करून आरोग्य तपासणी केली जाणार असतानाच अभियानांतर्गत आशा सेविका आणि आरोग्य यंत्रणा 13 लाख 29 हजार 53 लोकसंख्येच्या कार्यक्षेत्रात राहणार्या 66,438 कुटुंबांपर्यंत पोहणार आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्षांपर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. पावसाळ्याच्या दिवसांत बालकांमध्ये अतिसाराचा (डायरिया) धोका वाढतो, त्यामुळे आशा सेविका घरी आल्यास त्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे आणि बालकांना सुरक्षितता प्रदान करावी.
- डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हाधिकारी, गोंदिया