स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती थांबवा

वीज वितरण प्रशासनाला निवेदन

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
वाशीम,
smart-meters : जिल्ह्यातील वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत संदेश पाठविण्यात येत आहेत. मात्र केवळ संदेश पाठवून नागरिकांना विश्वासात न घेता, पुरेशी माहिती न देता व प्रक्रिया स्पष्ट न करता मीटर बदलण्याची घाई सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करु नये, अशी मागणी वाशीम जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष राजू चौधरी यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
washim
 
वाशीम जिल्ह्यात स्मार्ट विद्युत मीटर बसविण्याची सक्ती करण्यात येत आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये, असे विद्यमान न्यायालयाचे आदेश असतांनाही महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. यामुळे ग्राहकांत तीव्र रोष व्यक्त होत आहे. जुने मीटर व स्मार्ट मीटर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. महावितरण कंपनीकडून ग्राहकांना मोबाईल नंबवर संदेश पाठवून ४८ तासात मीटर बसविण्याची सक्ती केली जात आहे. विद्यमान न्यायालयाने ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये, असे स्पष्ट आदेश दिले असतांना महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सक्तीने मीटर बसविण्यास भाग पाडण्यात येत आहे. स्मार्ट मीटर हे ग्राहकांसाठी डोकेदुखी असून, मीटर बसविण्याचा खर्च ग्राहकांकडून वसूल केल्या जात असल्यााचा आरोपही निवेदनातून केला आहे.
 
 
 
एकीकडे ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत मिळत नाही. रिडींग न घेता मनमानी वीज बिलाची आकारणी होत असतांना आता स्मार्ट मीटर सक्तीचे केले आहे. या विरोधात काँग्रेस व वीज ग्राहक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदन देतांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांच्यासह वीज ग्राहकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
 
 
ग्राहकांना मिळालेला संदेश
 
 
भारत सरकारने जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, जर तुमचे मीटर ’स्मार्ट मीटर’ नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर महावितरण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी ’स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरमुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक बिलिंग होते. मोबाईल अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या विजेचा वापर आणि बिल यांवर लक्ष ठेवू शकता. घरगुती ग्राहकांना सौरऊर्जा उपलब्ध असलेल्या वेळेत प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळेल. मीटर बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, असे संदेशात नमूद आहे.