रामायण फेम सुनील लहरी शेतात उतरले

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
मुंबई
Sunil Lahri १९८० च्या दशकात दूरदर्शनवरील रामायण या ऐतिहासिक मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत एक नवा टेलिव्हिजन इतिहास घडवला होता. या मालिकेत प्रभू श्रीरामांचे धाकटे बंधू ‘लक्ष्मण’ ही लक्षवेधी भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेते सुनील लहरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांच्या अभिनयामुळे नव्हे, तर निसर्गाशी जोडलेल्या त्यांच्या साध्या आणि आगळ्या जीवनशैलीमुळे ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
 

Sunil Lahri  
अभिनयविश्वापासून काहीसे दूर असलेले सुनील लहरी सध्या त्यांच्या फार्महाऊसमधील सेंद्रिय शेतीमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांनी अलीकडेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ते स्वतः त्यांच्या शेताची सफर घडवताना आणि शेतीतील कामांमध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि कौतुकाची भावना निर्माण झाली आहे.
या फार्महाऊसमध्ये ते अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय शेती करत असल्याचे दिसून येते. पालक, मेथी, टोमॅटो, हिरवी मिरची, फ्लॉवर, कोबी आणि ढोबळी मिरची यांसारख्या भाजीपाल्यांसोबतच कलिंगड, केळी, पपई तसेच काजूची झाडेही त्यांनी मोठ्या मेहनतीने जोपासली आहेत. रासायनिक खतांचा वापर टाळून पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यावर त्यांचा भर असल्याचेही त्यांनी व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
 
 
व्हिडिओतील विशेष आकर्षणSunil Lahri  म्हणजे सुनील लहरी स्वतः शेतात उतरून शेवग्याच्या शेंगा तोडताना आणि विविध पिकांची माहिती देताना दिसतात. "माझ्या शेतातील प्रत्येक गोष्ट ही पूर्णपणे नैसर्गिक आणि रासायनिक खतांशिवाय पिकवलेली आहे," असे त्यांनी अभिमानाने सांगितले. त्यांच्या या साधेपणाने आणि निसर्गाशी असलेल्या जवळिकीने अनेकांना प्रभावित केले आहे.गेल्या काही वर्षांपासून ते मोठ्या पडद्यापासून दूर असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांशी सातत्याने संवाद साधत असतात. त्यांच्या या नव्या ‘शेतकरी अवतार’मुळे नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांच्या या जीवनशैलीला प्रेरणादायी ठरवत ‘जमिनीशी नातं जपणारा कलाकार’ अशी ओळख दिली आहे.सोशल मीडियावर या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत असून, चाहत्यांनी त्यांना ‘खऱ्या अर्थाने साधं आणि जमिनीशी जोडलेलं आयुष्य जगणारा कलाकार’ अशी उपमा दिली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारल्यामुळे सुनील लहरी पुन्हा एकदा नव्या पिढीसमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे आले आहेत.