दात्यांच्या दयेवर कळंबा बोडखेवाशीयांचे जगणे सुरू

शाश्वत पाणी पुरवठा योजना नसल्याने नागरिकांची होरपळ

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
मंगरूळनाथ, 
sustainable-water-supply-scheme : तालुक्यातील कळंबा बोडखे या तीन हजार च्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिकांचे सध्या मानवता जपणार्‍या दात्यांच्या दानशूर वृत्तीवर एक एक दिवस पुढे ढकलणे सुरू असल्याचे गंभीर व मनाला बैचेन करणारे वास्तव पुढे येत आहे.
 
 
 
jlk
 
 
 
मानवा सकट सगळ्या जीव जंतूंना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे असताना नेमकी हीच जीवनावश्यक बाब या गावात मागील अनेक वर्षांपासून उपलब्ध नाही. शाश्वत, अखंड आणि मुबलक प्रमाणात पेयजल उपलब्ध करून देण्यात स्थानिक ग्राम पंचायत प्रशासन, पंचायत समिती प्रशासन वा जिल्हा परिषद प्रशासन अयशस्वी ठरले असल्याने या गावातील नागरिकांना स्थानिक व बाहेरच्या दात्यांच्या दान केलेल्या पाण्यावर जगण्याची वेळ सध्या आलेली असल्याची माहिती या गावाचे नागरिक सुनील रतन चव्हाण यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.
 
 
गावातील सार्वजनिक विहिरी केव्हाच कोरड्या पडलेल्या आहेत. नागरिकांसाठी कुठलीही सार्वजनिक पेयजलाची व्यवस्था नसल्याने शेगी या गावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य आर. के. राठोड, स्थानिक डॉटर निवास चव्हाण आणि सुनील रतन चव्हाण यांनी आपल्या परीने स्थानिक नागरिकांची पाण्याची भूक भागावी यासाठी टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करून दिली होती.
 
 
एका दिवसाला जवळपास पंधरा हजार लिटर पाण्याची गरज असून, या गावाला दात्यांनी दिलेले पाणी ज्या दिवशी दिले त्याच दिवशी संपून जाते. दुसर्‍या दिवशी कोणी दाता पुढे आला तर या गावातील अबाल वृद्धांना गाईगूरांना पाण्याची सोय होते अशी भीषण अवस्था सध्या असल्याची माहिती सुद्धा चव्हाण यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने कळंबा बोडखे या गावातील नागरिकांना सध्या पडत असलेल्या प्रखर उन्हात दररोज पेयजल उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने पुढे येत आहे.