‘एक होतं माळीण’ २४ जुलैला येणार

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
मुंबई,
The movie 'Ek Hota Malin' पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात ३० जुलै २०१४ रोजी घडलेल्या माळीण दरड दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग कोसळून संपूर्ण गाव मातीखाली गाडले गेले होते. या भीषण दुर्घटनेत शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर अनेकांना आपले प्रियजन गमवावे लागले. या काळजाला भिडणाऱ्या सत्य घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा मराठी चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.२४ जुलै रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट माळीण दुर्घटनेतील वेदना, संघर्ष आणि मानवी भावविश्व मोठ्या पडद्यावर उभे करणार आहे. चित्रपटासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून माळीण गावाचा भव्य सेटही उभारण्यात आला आहे. नुकतेच चित्रपटाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी केली असून रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्ता गायकर आणि राजू राणे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संकल्पना राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
 
 
 
Ek Hota Malin
चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय प्रभावी संगीत, दमदार छायांकन आणि व्हीएफएक्सच्या मदतीने दुर्घटनेचे वास्तवदर्शी चित्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, चित्रपटाची कथा अधिक वास्तववादी व्हावी यासाठी निर्मात्यांनी आणि लेखकांनी माळीणमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून माहिती संकलित केली आहे. त्यामुळे या चित्रपटातून केवळ एक दुर्घटना नव्हे, तर त्या मागील मानवी वेदना आणि संघर्षही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत.