नवी दिल्ली,
Vaibhav Suryavanshi flops in ODIs. आयपीएलमधील स्फोटक कामगिरीनंतर मोठ्या अपेक्षांसह इंडिया ‘अ’ संघात स्थान मिळवलेल्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला त्रिकोणी मालिकेत अद्याप आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या सामन्यातही त्याची खेळी फार काळ टिकली नाही आणि तो अवघ्या २१ धावांवर बाद झाला.या मालिकेतील हा त्याचा सलग तिसरा सामना ठरला ज्यामध्ये त्याला अर्धशतकाचा टप्पा गाठता आला नाही. सुरुवातीला संयमाने फलंदाजी करत त्याने काही आकर्षक फटके खेळले. आपल्या खेळीत त्याने चौकार आणि षटकारांचीही नोंद केली होती. मात्र, डाव मोठा करण्याऐवजी आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली.

त्रिकोणी मालिकेत वैभवची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. आतापर्यंतच्या तीन डावांत त्याला मोठी खेळी उभारता आलेली नसून त्याची सर्वोच्च धावसंख्या ४४ इतकी राहिली आहे. काही चमकदार फटके खेळूनही तो खेळपट्टीवर दीर्घकाळ टिकू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या सातत्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभवकडून या मालिकेतही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्याप त्याला अपेक्षित लय सापडलेली दिसत नाही. आगामी सामन्यांमध्ये तो पुनरागमन करतो का, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.