वर्धा,
fraud-case : शहरातील कच्छी लाईन परिसरातील वर्धा अर्बन अॅण्ड रुरल को-ऑपरेटिव्ह बँकेत उघडकीस आलेल्या कथित आर्थिक अपहार प्रकरणाच्या तपासाला आर्थिक गुन्हे शाखेने गती दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी आणि बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक प्रवीण बोरकर यांच्या घरातून ३ लाख रुपये रोख तसेच बँकेतून सुमारे १०२ ग्रॅम सोने जप्त केले आहे.

धूनिवाले मठ परिसरातील रहिवासी प्रवीण बोरकर याने बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. बँकेत बनावट सोने गहाण ठेवल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच एका महिलेला एफडी आणि सोने गहाण ठेवण्याच्या नावाखाली ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रवीण बोरकर यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात आतापर्यंत ९ तक्रारी दाखल झाल्या आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक पुंडलिक भटकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बोरकर यांच्या घरातून रोकड आणि बँकेतून सोने जप्त केले आहे. सध्या आरोपी प्रवीण बोरकर न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.