पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाच्या डोळ्यातील पाणीही आटले

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
मालेगाव, 
rain-farmers : ७ जून रोजी निसर्गचक्रानुसार मृग नक्षत्राला प्रारंभ तर झाला, पण आकाशात ढगांची दाटी असूनही रोज पाऊस हुलकावणी देत आहे. पूर्वीच्या काळी ७ जूनला हमखास हजेरी लावणारा पाऊस गेल्या काही वर्षांपासून गडप होत असल्याने यंदाही मृगाची सुरुवात कोरडी झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत शेकर्‍यांचे डोळेही कोरडे पडले आहेत.
 
 
k
 
 
 
गेल्या काही दिवसापासून मालेगाव आणि परिसरात दररोज ढगाळ वातावरण तयार होत आहे. हवेत निर्माण होणारा गारवा आणि वातावरण पाहता, यंदा मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी जोरदार पाऊस पडेल, अशी दाट शयता शेतकर्‍यांना वाटत होती. मात्र, मृग नक्षत्र लागून आठ दिवसाचा कालावधी झाला आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस पडेल या आशेने शेतकर्‍यांनी आधीच कंबर कसली आहे. त्यात हवामान खात्याकडून पावसाबाबत आधी १५ जून ही तारीख अपेक्षित होती. मात्र हवामानातील काही बदलामुळे ही तारीख आता २० जून च्या पुढे जात आहे. यंदा अवकाळी पाऊस पडला नाही. त्यामुळे बहुतांश शेतातील विहिरी तसेच गावातील बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्याची भयान टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, पावसाची नितांत गरज असल्याने नागरिक तसेच शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. या नक्षत्राच्या उर्वरित दिवसांत वरुण राजाची कृपादृष्टी होईल आणि दमदार सरी कोसळतील, असा विश्वास शेतकर्‍यांना आहे. मृगाच्या सरी कोसळताच परिसरात पेरणीच्या कामांना वेग येईल. एकंदरीत, मृगाची सुरुवात जरी कोरडी झाली असली, तरी हे नक्षत्र केवळ मृगजळ’ ठरू नये आणि लवकरच मुसळधार पाऊस पडून धरणीमाता तृप्त व्हावी, हीच आर्त साद बळीराजा निसर्गाला घालत आहे.
 
 
शेतकर्‍यांनी हंगामाची तयारी म्हणून शेतांची नांगरणी, वखरणी आणि रोटावेटर ही मान्सून पुर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. खरीप हंगामासाठी लागणारे सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासारख्या प्रमुख पिकांचे बियाणे आणि खतांची खरेदी करून शेतकरी सज्ज झाला आहे. मृग नक्षत्रात झालेला पाऊस हा जमिनीसाठी अमृत मानला जातो. या नक्षत्रात पेरणी लायक पाऊस झाल्यास पिकांची उगवण क्षमता उत्तम राहते आणि संपूर्ण खरीप हंगाम फायद्याचा ठरतो अशी शेतकर्‍यांची पूर्वापार श्रद्धा आहे. हवामानात होत असलेल्या बदलांमुळे गेल्या काही वर्षांत मान्सून लांबणीवर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. गतवर्षीचा विचार केला तर ११ जून २०२५ रोजी मृग नक्षत्रातच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्या समाधानकारक पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खरिपाच्या पेरण्या वेळेत आटोपल्या होत्या आणि हंगामही चांगला गेला होता.