वाशीम,
district-collector-kumbhejkar राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) मार्फत २१ जून २०२६ रोजी होणार्या नीट (यूजी) पुनर्परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रप्रमुख, निरीक्षक व संबंधित अधिकार्यांची अभिमुखता बैठक आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील १० परीक्षा केंद्रांवर ३ हजार ९५ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून परीक्षा प्रक्रियेचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. बैठकीस निवासी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी संजय नागटिळक, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य तथा यूजीसी परीक्षा समन्वयक सुनील मोरे यांच्यासह परीक्षा व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुंभेजकर पुढे बोलतांना म्हणाले की, नीट ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडित अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर कोणतीही अडचण येणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीत परीक्षा केंद्रांवरील प्रवेश व्यवस्था, बायोमेट्रिक पडताळणी, फ्रिस्किंग, दस्तऐवज तपासणी, प्रश्नपत्रिका वितरण, ओएमआर उत्तरपत्रिकांचे संकलन व पॅकिंग, व्हिडिओग्राफी, सीसीटीव्ही निरीक्षण तसेच सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक उमेदवाराला एकाच मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार असून मुला-मुलींसाठी स्वतंत्र फ्रिस्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ, नोंदणी कक्ष, नियंत्रण कक्ष, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
परीक्षा दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारांना प्रवेश दिला जाणार असून दुपारी १.३० वाजल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होणार आहे. पात्र दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. district-collector-kumbhejkar परीक्षेच्या निष्पक्षतेसाठी प्रत्येक केंद्रावर व्हिडिओग्राफी, सीसीटीव्ही निरीक्षण, बायोमेट्रिक पडताळणी आणि कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ उपकरणे, कॅल्युलेटर, बॅग, पर्स व इतर प्रतिबंधित साहित्य परीक्षा केंद्रात आणण्यास सक्त मनाई असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.