ठेकेदाराला अटक
आर्वी,
Arvi Municipal Council नगर परिषद हद्दीतील मौजा सारंगपुरी येथील काही पाईप जमिनीतून काढून चोरी केल्याची माहिती नगरसेवक गुड्डू गावंडे यांनी दिली. या प्रकरणी मुख्याधिकारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ठेकेदाराला अटक केली. आर्थिक अडचणीतून आपण नपचे पाईप चोरले असल्याची कबुली ठेकेदाराने पोलिसांना दिली. मिळालेल्या माहिती वरुन नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, नगरसेवक व मुख्याधिकारी किरण सुकळवाड यांनी माहिती घेतली.
मुख्याधिकारी किरण सुकळवाड यांनी ठाणेदार सतीश डेहनकर यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली असता सारंगपुरी तलावातून आर्वी शहरात पाणी पुरवठा करणारी जुनी बंद झालेली जलवाहिनी मधील लोखंड व बीडाचे काही पाईप तेथून परस्पर खोदकाम करून जमिनीतून काढून नेल्याचे स्पष्ट झाले. नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने यांचे नेतृत्वात उपाध्यक्ष गौरव जाजू, गटनेता संजय थोरात,पाणी पुरवठा सभापती अजय कटकमवार आदींनी पाईप चोरी प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली. नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता निलेश नरपाचे यांनी पोलिस तक्रार दिली.
ठाणेदार सतीश डेहनकर यांनी लगेच सूत्र हलवली व या प्रकरणातील मुख्य आरोपी मजीप्राचे ठेकेदार शैलेश भुजाडे याला तत्काळ अटक केली. पोलिसी खाक्या दाखवला असता आर्थिक अडचणीत असल्यामुळे सारंगपुरी येथील 9 फुटाचे लोखंडाचे 10 पाईप विकले असल्याने ठेकेदाराने सांगितले. या चोरी केलेल्या संपूर्ण पाईप ची किंमत ४० हजार रूपये आहे.