- नीरीचा अनोखा उपक्रम
नागपूर,
Bamboo Handicrafts सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर-नीरी) येथे दिनांक १६ ते २० जून या कालावधीत महिला बचत गटांसाठी बांबू हस्तकलेवरील पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. “फ्लाय ॲश डंपवर उगवलेल्या बांबूपासून हस्तकला निर्मितीद्वारे महिला बचत गटांचे सक्षमीकरण” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुदीप राणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सीएसआयआर-नीरीचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन होते. यावेळी डॉ. महेंद्र पी. पाटील आणि उप कार्यकारी अभियंता प्रवीण बुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
- महिला सक्षमीकरणाला चालना
मार्गदर्शन करताना सुदीप राणे यांनी बांबू आधारित उपजीविका निर्मितीसाठी सीएसआयआर-नीरीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. महिलांनी बांबू क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. मोहन यांनी पर्यावरणीय पुनर्स्थापना, हवामान अनुकूलता आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी बांबूचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रशिक्षणात सहभागी महिलांना बांबूची कापणी, प्रक्रिया, संवर्धन, हस्तकला निर्मिती, मूल्यवर्धित उत्पादन विकास, उत्पादन डिझाइन, ब्रँडिंग आणि विपणन याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यक्रम संयोजक डॉ. लाल सिंह यांनी बांबू आधारित इको-रीजुव्हनेशन टेक्नॉलॉजीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.