लाचप्रकरणी दुय्यम निबंधकासह ‘ऑपरेटर’वर कारवाई

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर, 
Bribery case येथील मुद्रांक नोंदणी विभाग कार्यालयाचे दुय्यम निबंधक (श्रेणी 1) मोहन चंद्रकांत शेट्टीवार व त्यांच्या ‘ऑपरेटर’ला 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार, 16 जून रोजी रंगेहात पकडले. मालमत्तेच्या दस्तऐवजाची नोंदणी करण्याच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.
 
 
Bribery case
 
तक्रारदाराने त्यांचे पक्षकार यांची भद्रावती तालुक्यातील मालमत्तेची नोंदणी होण्याकरीता चंद्रपूर दुय्यम निबंधक कार्यालय येथे कागदपत्रे सादर केली असता, दुय्यम निबंधक मोहन शेट्टीवार यांनी दस्तऐवजाची नोंदणी करण्यासाठी त्यांच्या ऑपरेटरमार्फत 4 हजार रूपये लाचेची मागणी केली. परंतु, तक्रारदार यांना आरोपी मोहन शेट्टीवार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी मोहन शेट्टीवार यांची पंचासमक्ष पडताळणी व सापळा कारवाई करण्यात आली. मालमत्तेच्या दस्तऐवजाची नोंदणी करून दिल्याचा मोबदला म्हणून 4 हजार रूपये लाचेची मागणी करून, त्यांच्या ऑपरेटरमार्फत स्वीकारले. पुढील तपास सुरू आहे.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, नागपूरच्या अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलिस निरीक्षक सचिन धर्मेजवार, पोलिस हवालदार हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, विजेंद्र वाढई, पोलिस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदिप ताडाम आदींनी यशस्वीरीत्या पार पाडली.