इंदूर,
brutal-murder-in-indore इंदूरमधील अन्नपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७० वर्षीय मंदिर सेवक कैलाश मोदी यांच्या निर्घृण हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिराच्या पावित्र्याशी संबंधित वादातून घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात आरोपीने केलेला अमानुष हल्ला स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मंदिरात चौकीदार म्हणून काम करणारा मुकेश शर्मा याला मंदिर परिसरात दारू पिण्यापासून वारंवार रोखले जात होते. यावरून त्याच्यात आणि कैलाश मोदी यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी सकाळी पुन्हा दोघांमध्ये याच मुद्द्यावरून वाद झाला आणि तो क्षणात हिंसक झाला.
आरोपी मुकेश शर्मा नशेत मंदिरात परतल्यानंतर वाद अधिक चिघळला. रागाच्या भरात त्याने जवळ पडलेली काठी उचलून कैलाश मोदी यांच्यावर हल्ला केला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या दृश्यांनुसार आरोपीने वृद्ध सेवकावर तब्बल ३१ वेळा वार केले. हल्ल्यातून वाचण्यासाठी कैलाश मोदी मंदिरातून बाहेर पडले आणि जवळच्या गुरुद्वाराकडे धाव घेतली. मात्र आरोपीने त्यांचा पाठलाग करत हल्ला सुरूच ठेवला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी मुकेश शर्माला अटक केली असून पुरावे जप्त केले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कैलाश मोदी हे अत्यंत धार्मिक आणि मंदिर सेवेला समर्पित व्यक्ती होते. ते दीर्घकाळ मंदिर व्यवस्थापनात कार्यरत होते. आरोपी वारंवार दारू पिऊन मंदिरात गोंधळ घालत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मंदिराच्या पावित्र्याच्या वादातून घडलेली ही घटना संपूर्ण शहरासाठी धक्कादायक ठरली आहे.