नागपूर,
summer-exam-2026 : उन्हाळी परीक्षा २०२६ दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थेत पुन्हा गंभीर त्रुटी समोर आली आहे. चुकीच्या प्रश्नपत्रिका आणि उपस्थिती पत्रके गहाळ, हॉल तिकिटांमधील चुका होण्याच्या घटनांनंतर आता चुकीचा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे.
उत्तीर्ण असूनही 'नापास' घोषित
हिंगणघाट येथील कायदा शाखेच्या पाचव्या सत्रातील चार विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण मिळाले असूनही त्यांना चुकीने 'नापास' घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हा प्रकार सिनेट सदस्य राहुल हनवते यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विद्यापीठाने चौकशी केली. तपासात तांत्रिक त्रुटीमुळे ही चूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुधारित गुणपत्रिका जारी करून संबंधित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले.
यापूर्वी बी.ए. द्वितीय सत्र (एनईपी) विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर चुकीच्या विषयाचा उल्लेख करण्यात आला. 'ओपन इलेक्टिव्ह-१' ऐवजी 'ओपन इलेक्टिव्ह-२' छापण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवरील परीक्षा केंद्रे आणि प्रत्यक्ष नेमून दिलेली केंद्रे यांतही तफावत आढळली.
विद्यार्थ्यांची चिंता वाढली
विद्यापीठाने ही चूक तांत्रिक असल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांना नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षेला बसण्याचे निर्देश दिले. मात्र निकाल, हॉल तिकिटे, विषय आणि केंद्र वाटपातील वारंवार होणाऱ्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अशा चुका केवळ 'तांत्रिक बिघाड' म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत, अशी भूमिका विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मांडली आहे.