नवी दिल्ली,
controversy by Vaibhav Suryavanshi श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगा मालिकेत भारताच्या युवा संघाचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. श्रीलंका अ संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर मैदानात घडलेल्या एका घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला असून, त्याचे पडसाद क्रिकेटविश्वात उमटू लागले आहेत. सामना अत्यंत चुरशीचा ठरला आणि तो सुपर ओव्हरपर्यंत गेला. सुपर ओव्हरमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. विजयानंतर श्रीलंकन खेळाडूंच्या जल्लोषादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. याच दरम्यान वैभव सूर्यवंशी एका विरोधी खेळाडूकडे गेला आणि त्याच्याशी झालेल्या वादातून धक्काबुक्कीची घटना घडली. प्रत्युत्तरात संबंधित श्रीलंकन खेळाडूनेही प्रतिक्रिया दिल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. पंच आणि इतर खेळाडूंनी हस्तक्षेप करून हा वाद नियंत्रणात आणला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर वैभव सूर्यवंशीवर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी त्याच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, खेळातील शिस्तभंगाबाबत चर्चा सुरू झाली आहे.या प्रकरणावर प्रतिक्रया देताना श्रीलंका संघाचे माजी व्यवस्थापक ब्रायन थॉमस यांनी सोशल मीडियावर केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. त्यांनी वैभवच्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत अत्यंत कठोर शब्दांत टीका केली, ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विधानावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून, ते वक्तव्य अपमानास्पद असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. क्रिकेटच्या नियमांनुसार मैदानात अशा प्रकारचे शारीरिक गैरवर्तन गंभीर शिस्तभंग मानले जाते. त्यामुळे वैभव सूर्यवंशीवर मॅच रेफरी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मॅच अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.