मुख्यमंत्री भगवंत मान ‘पंथविरोधी’ घोषित

अकाल तख्तचा मोठा निर्णय

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
चंदिगढ,
Declared anti-Bhagwant Maan Panth पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, कारण शीख धर्माची सर्वोच्च धार्मिक संस्था अकाल तख्त साहिबयांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना ‘पंथविरोधी’ आणि ‘गुरू डोखी’ घोषित केले आहे. या निर्णयामुळे राज्यात तसेच देशभरात राजकीय आणि धार्मिक वाद निर्माण झाला आहे. अकाल तख्तच्या या घोषणेनंतर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री भगवंत मान यांचा एक व्हिडिओ शेअर करत विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, काही राजकीय शक्ती खोट्या माहितीचा वापर करून आम आदमी पक्ष आणि त्याच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
 
 
,amm
 
या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी एका कथित व्हिडिओशी जोडली जात आहे. भगवंत मान यांनी दावा केला आहे की, संबंधित व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार करण्यात आला असून तो पूर्णपणे खोटा आहे. त्यांनी अकाल तख्तसमोर हजर राहून या प्रकरणात आपली बाजू मांडल्याचे सांगितले आहे. मान यांच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओतील व्यक्ती त्यांच्यासारखीही दिसत नाही आणि तरीही त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.दरम्यान, अकाल तख्तने सोमवारी अमृतसरमध्ये झालेल्या उच्चस्तरीय धार्मिक बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. जथेदार ज्ञानी कुलदीप सिंग गडगज यांनी ‘फसील’वरून घोषणा करत सांगितले की, संबंधित कथित आक्षेपार्ह प्रकरणामुळे भगवंत मान यांना ‘गुरूंचे गद्दार’ आणि ‘खालसा पंथविरोधी’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच शीख समुदायाने त्यांच्याशी सामाजिक आणि धार्मिक संबंध तोडावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
या बैठकीत अनेक शीख संघटनांचा सहभाग होता. धार्मिक शिस्त आणि कायद्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. विशेषतः प्रस्तावित धर्मद्रोहविरोधी कायदा आणि शीख धार्मिक संस्थांशी संबंधित सुधारणा यावरही विचारविनिमय झाला. या निर्णयानंतर पंजाबच्या राजकीय वातावरणात तणाव वाढला असून, पुढील काळात या प्रकरणाचे पडसाद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.