न्यूयॉर्क
did ai prove to be a game changer अमेरिकेतील न्यायालयीन खटल्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या मेटा आणि गुगल यांना मार्च महिन्यात न्यायालयाने ६ दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावल्याच्या प्रकरणानंतर आता एक नवा खुलासा समोर आला आहे, ज्यामुळे तंत्रज्ञान आणि कायदा क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या खटल्यात एका २० वर्षीय महिलेच्या वतीने वकील मार्क लॅनिएर यांनी युक्तिवाद केला होता. या महिलेने आरोप केला होता की इंस्टाग्राम, टिकटॉक आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्यसनाधीन करणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे तिच्या बालपणावर नकारात्मक परिणाम झाला. न्यायालयाने सुनावणीनंतर मेटा आणि गुगल या कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील संभाव्य धोक्यांविषयी पुरेशी चेतावणी न दिल्याचा ठपका ठेवत दंड ठोठावला होता.

आता या प्रकरणात वकील लॅनिएर यांनी धक्कादायक खुलासा करत सांगितले आहे की त्यांनी खटल्याच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला होता. त्यांनी वापरलेले “बुडलबॉक्स” नावाचे एआय टूल चॅटजीपीटी, क्लॉड आणि जेमिनी या तीन वेगवेगळ्या एआय प्रणालींना एकाच वेळी जोडते, ज्यामुळे संशोधन आणि विश्लेषण अधिक जलद होते. लॅनिएर यांच्या म्हणण्यानुसार, हे एआय साधन त्यांच्या संपूर्ण कायदेशीर टीमचा विस्तार असल्यासारखे काम करत होते. ते सतत २४ तास डेटा विश्लेषण करू शकत होते आणि प्रत्येक फाईलची माहिती लक्षात ठेवत होते. मात्र, त्यांनी हेही मान्य केले की एआय परिपूर्ण नाही आणि काही वेळा चुकीची माहितीही देऊ शकतो.
विशेष म्हणजे, ज्या दिवशी लॅनिएर यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची उलटतपासणी केली, त्या दिवशीही त्यांनी एआयच्या मदतीने तयारी केली होती. कोर्टातील ट्रान्सक्रिप्ट्स, कागदपत्रे आणि युक्तिवादाची दिशा ठरवण्यासाठी या साधनाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दररोजच्या सुनावणीतील नोंदी एआयमध्ये टाकून त्यांचे विश्लेषण करून युक्तिवाद मजबूत केला जात होता, असेही त्यांनी सांगितले. मात्र न्यायालयात एआयचा वापर योग्य आहे का यावर अद्याप वाद सुरू असून अनेक कायदेतज्ज्ञ याबाबत सावध भूमिका घेत आहेत. या खुलाशामुळे कायदा क्षेत्रात एआयच्या वाढत्या वापराबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे आणि भविष्यात न्यायालयीन प्रक्रियेत एआयची भूमिका कितपत स्वीकारली जाईल, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.