हिंगणघाट बाजार समितीकडून शेतकऱ्यांना पेरणी यंत्रांचे वाटप- ॲड. सुधीर कोठारी

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट,
adv-sudhir-kothari शेती व्यवसायात वाढती मजुरांची टंचाई, वाढलेले मजुरीचे दर व बदलत्या हवामानामुळे शेती व्यवसायावर होत असलेला परिणाम व वेळेत पेरणी न केल्यास तसेच मळणी न केल्यास त्याचा उत्पन्नावर होत असलेला परिणाम लक्षात घेता शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देणे हि काळाची गरज झाली आहे. सदर बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे हित व शेती व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने बाजार समितीच्या संचालक मंडळाने दि. ३०/०३/२०२६ च्या सभेमध्ये हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे टोकन/ पेरणी यंत्राचा पुरवठा करण्याबाबत निर्णय घेतला होता.
 
 
adv-sudhir-kothari
 
त्यानुसार समितीमार्फत ई-निविदा प्रक्रियेचा अवलंब करून नामांकित बियाणे टोकन/ पेरणी यंत्राचे उत्पादन/ पुरवठा करणाऱ्या फर्म/ कंपनीकडून दरपत्रक मागविण्यात आले आणि पडगीलवार कंपनीच्या रक्कम रु. ५,५००/- किंमतीच्या बियाणे टोकण यंत्राची निवड करण्यात आली. सध्या बाजारामध्ये याच यंत्राची किंमत सुमारे रु. ७,०००/- इतकी आहे. बाजार समितीकडून पुरवठा करण्यात येणारे बियाणे टोकन/ पेरणी यंत्र मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी सादर करावयाच्या मागणी अर्जाचे वितरण दि. ०२/०४/२०२६ पासून सुरु करण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जाच्या क्रमांकानुसार दि. २५/०५/२०२६ पासून समितीचे छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथून प्रत्यक्ष यंत्रांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. आजपावेतो एकूण ११५० शेतकऱ्यांकडून आवश्यक दस्तावेजासह प्रस्ताव दाखल करण्यात आलेले असून त्यापैकी १०७१ प्रस्तावधारकांना पेरणी हंगाम सुरू होण्यापूर्वीच टोकण यंत्राचे यशस्वीरित्या वितरण करण्यात आले आहे. उर्वरित पात्र प्रस्तावधारकांना सुद्धा त्यांच्या प्रस्तावाच्या क्रमांकानुसार यंत्र साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
 
 
याशिवाय, कै. वसंत नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या सूचनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर (मोफत) बियाणे टोकण/पेरणी यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय संचालक मंडळाने दि. ३०/०४/२०२६ रोजी घेतला. त्याअनुषंगाने महसूल विभागाकडून प्राप्त माहितीनुसार हिंगणघाट तालुक्यातील ५१ व समुद्रपूर तालुक्यातील १६ अशा एकूण ६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची यादी समितीस प्राप्त झाली आहे. या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून आजपर्यंत ४२ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २६ पात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत बियाणे टोकण/पेरणी यंत्रांचे वितरण करण्यात आले आहे.
 
 
सदर २६ लाभार्थ्यांपैकी आज दि. १६/०६/२०२६ रोज मंगळवारला हिंगणघाट तालुक्यातील श्रीमती शितल संदीप बोभाटे रा. सोनेगाव (धोटे) व प्रभा फागो बोरकर रा. इंझाळा तसेच समुद्रपूर तालुक्यातील श्रीमती शर्मिला गजानन वाट रा. सावरखेडा व श्री. शांताराम नत्थूजी काष्ठी रा. तावी या ०४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांचे शुभहस्ते बियाणे टोकन यंत्राचे वितरण करण्यात आले.
 
 
यावेळी बाजार समितीचे उपसभापती हरिष वडतकर, संचालक मंडळ मधुकर डंभारे, मधुसूदन हरणे, ओमप्रकाश डालिया, प्रफुल बाडे, उत्तम भोयर, अशोक उपासे, राजेश मंगेकर, डॉ. निर्मेश कोठारी, घनश्याम येरलेकर, पंकज कोचर,  संजय कातरे, शुभ्रबुध्द कांबळे, हर्षद महाजन, ज्ञानेश्वर लोणारे, माधुरी चंदनखेडे, नंदा चांभारे, हिंगणघाट खरेदी-विक्री संस्थेचे संचालक तेजस तडस, व्यापारी भागचंद ओस्तवाल, नितीन जोबनपुत्रा, मनीष चीतलांगे, गोविंद मानधनिया, पियुष अग्रवाल, गणेश चंदनखेडे, सचिव टी. सी. चांभारे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.