अन्नपदार्थांतील फसवणुकीला प्रशासनाची लगाम

चीज अॅनालॉगबाबत फलक बंधनकारक

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
नागपूर,
cheese-analogue : अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात आता निर्णायक कारवाईची तयारी सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या त्रैमासिक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेसळ रोखण्यासाठी तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले.
 
 
 

food
 
 
अलीकडच्या काळात चीजच्या नावाखाली ‘चीज अॅनालॉग’चा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. विशेषतः पनीर आणि चीज अॅनालॉग यांतील फरक अनेकांना माहिती नसल्याने खरेदीवेळी दिशाभूल होण्याची शक्यता वाढली आहे. यावर उपाय म्हणून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांनी आपल्या दर्शनी भागावर या दोन्ही उत्पादनांमधील फरक स्पष्ट करणारे फलक लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
 
बैठकीत अन्नपदार्थांचे नमुना संकलन, तपासणी, परवाना व नोंदणी प्रक्रिया तसेच जनजागृती उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्नसुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
 
दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल, मसाले, बेकरी पदार्थ आणि इतर दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थांची नियमित तपासणी करून संशयित नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याचे आदेशही देण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
 
नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित करताना, अन्न व औषध प्रशासन विभागाने अधिक दक्षतेने आणि प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बैठकीला विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.