नागपूर,
nagpur-university : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा निकाल, पुनर्मूल्यांकन प्रक्रियेतील विलंब आणि विद्यार्थ्यांच्या विविध तक्रारींची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यापीठाला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर नीरज धाराशिवकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. हिवाळी सत्रातील परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला होता.
विद्यापीठाच्या वतीने वकील नहुष खुबळकर यांनी न्यायालयाला सांगितले की, हिवाळी सत्रातील सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले असून सध्या कोणताही निकाल प्रलंबित नाही. मात्र, न्यायालयाने केवळ निकालांपुरते मर्यादित न राहता याचिकेतील इतर तक्रारींचीही गंभीर दखल घेतली.
पुनर्मूल्यांकनाच्या निकालांमध्ये होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना सुधारित गुणांची प्रतीक्षा करत असतानाच पूरक किंवा बॅकलॉग परीक्षांना सामोरे जावे लागत असल्याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. यावेळी खंडपीठाने, "हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे," असे स्पष्ट निरीक्षण नोंदवले.
तसेच, परीक्षा देऊनही विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविण्यात आल्याच्या तक्रारींबाबतही न्यायालयाने विद्यापीठाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. या सर्व तक्रारींचे निवारण आणि त्यावरील कार्यवाहीचा तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी १ जुलै रोजी होणार असून, याचिकाकर्त्याच्या वतीने वकील भूषण मोहता यांनी बाजू मांडली.