अनिल कांबळे
नागपूर,
Illegal stockpile of weapons कळमना पोलिस ठाणे हद्दीतील गुलमोहर नगर परिसरात अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तलवार व दोन धारदार चाकू जप्त केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कळमना पोलिसांनी छापा टाकला असता कुणाल मोहन बंजारे (वय १९) याच्या घरातून सुमारे ५ हजार किमतीची स्टीलची तलवार जप्त करण्यात आली. चौकशीत ही तलवार त्याने तरुण उर्फ शिवम शत्रुघ्न वर्मा (वय २३) याच्याकडून घेतल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीच्या घराची झडती घेतली असता दोन धारदार स्टीलचे चाकू जप्त करण्यात आले. गुलमोहर नगर परिसरात शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपींचा शोध घेतला आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान कारवाई करून दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल, सहपोलिस आयुक्त विवेकानंद रेड्डी, पोलिस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलिस आयुक्त रोहित ओखळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रवीण काळे आणि पोउपनि संतोषकुमार रामलोड, रवीकुमार शाहू, प्रदीप पवार, मंगेश लोही, संतोष पांडे, अनिल जाधव आणि प्रफुल्ल गोहोकार यांनी केली.