उंबर्डा बाजार,
umbarda-bazar अन्न व औषध प्रशासनाचे विशेष पथक उंबर्डा बाजारमध्ये धडक कारवाई करणार, या एकाच चर्चेने उंबर्डा बाजार येथील मेडिकल चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. प्रशासकीय कारवाईच्या भीतीपोटी शहरातील बहुतांश मेडिकल दिवसभर आपले शटर डाऊन ठेवणेच पसंत केले. परिणामी रुग्णांची गोळ्या औषध घेण्यासाठी दिवसभर चांगलीच कोंडी झाली होती .
तसेच उंबर्डा बाजारपेठ, प्रमुख चौक आणि वर्दळीच्या रस्त्यांवरील मेडिकल वर नेहमीच नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, नेहमीचे चित्र पूर्णपणे बदलले होते. सर्व प्रमुख मेडिकल बंद असल्याने अनेकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. रुग्णांच्या पदरी केवळ निराशाच आली. उंबर्डा बाजार येथील एकाच दिवशी सर्व मेडिकल शंभर टक्के बंद राहिल्याचे चित्र क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे या एकत्रित शटरडाऊनची दिवसभर जोरदार चर्चा रंगली.
प्रशासनाच्या केवळ धाकामुळे बेकायदेशीर गोष्टींना कसा आळा बसू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. या अभूतपूर्व घडामोडीनंतर, सार्वजनिक आरोग्याचा विचार करता प्रशासनाने अशा कारवाया केवळ कागदावर किंवा मोहिमेपुरत्या मर्यादित न ठेवता, त्या सातत्याने करायला हव्यात, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. तरी या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाने उंबर्डा बाजार येथे आकस्मिक भेट देऊन अवैध व बिना फार्मासीस्ट मेडिकलची कसूर तपासणी करून नियमांना तिलांजली देणार्या मेडिकल व्यावसायिकांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थ व युवा वर्गाकडून केली जात आहे.