वातकुक्कुटांचा ‘दिशा-शोध!’

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
अग्रलेख...
Indian Politics हवामानाचे अंदाज वर्तविणारे शास्त्र काळाबरोबर प्रगत होत गेले असले, तरी पारंपरिक पठडीबाज अंदाजशास्त्रांच्या आधारावर आजही काही आडाखे बांधले जातात; अनेकदा ते प्रगत हवामानशास्त्राच्या अंदाजाहूनही अचूक असतात, असे दिसून आले आहे. हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या परंपरागत शास्त्रावर विसंबून हवामानातील बदलाचे आडाखे बांधण्याच्या प्रथांची मान्यता अजूनही टिकून आहे. जेव्हा विज्ञानाने आजच्याएवढी झेप घेतली नव्हती आणि शेकडो मैलावरचे वारे आपल्यापर्यंत पोहोचतील तेव्हा त्यांची दिशा कोणती असेल, याचा अंदाज वर्तविणारे वातकुक्कुट आजही अनेक ठिकाणी वाहत्या वाऱ्यांचे दिशादर्शक म्हणून काम करीत असतात. वाहत्या वाऱ्याची दिशा ओळखून त्यानुसार पाठ फिरवावी हा धडा याच वातकुक्कुटाने माणसास दिला; राजकारणाने तो तंतोतंत गिरविण्यास सुरुवातही केली. यामुळेच राजकारणातील हवामानाचे अंदाज अचूकपणे बांधण्याचे काही तंत्र याच पठडीबाज पद्धतीवर बेतलेले असल्याने ते सहसा चुकत नाहीत. राजकारणात अनेकदा वादळाच्या शक्यता वर्तविल्या जातात, भूकंपाची भाकितेही केली जातात, प्रचंड उलथापालथ होण्याचे अंदाज व्यक्त केले जातात, तेव्हा त्यामागे अशाच काही पठडीबाज परंपरांच्या अनुभवाचाच आधार घेतला जातो. ‘राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो’ या विचारास राजकारणात सुभाषिताचे स्थान प्राप्त झाले आहे. अशी वाक्ये जेव्हा कानावर येऊ लागतात, तेव्हा त्यामध्ये भविष्याचे काही संकेत लपलेले असतात, हे अनेकांस अनुभवाने ठावूक असते.
 
 
sharad
 
काही वेळा भविष्यात कोणत्याही कोलांटउड्या वगैरे मारण्याची वेळ आलीच, तर त्यासाठी अगोदरच सोयीस्कर वातावरण तयार करून ठेवण्याची खबरदारी घ्यावी लागते. अशा वेळी भविष्याविषयीचे नेमके अंदाज वर्तविता येत नसतील तरीही या सुभाषिताचा उच्चार करणे सोयीचे ठरते. एखादा नेता अशी काही वक्तव्ये करू लागतो, तेव्हा ते राजकारणातील संभाव्य वादळ, भूकंप, उलथापालथ किंवा धक्क्यांचे संकेत असतात. अनेकदा अशा संकेतांचा अर्थ सर्वसामान्यांना उमगत नाही, पण या वक्तव्यांमागील योग्य तो संदेश योग्य त्या ठिकाणी पोहोविण्याचे काम मात्र अशी सुभाषिते चोखपणे बजावत असतात. अशा वक्तव्यांच्या वेळा हा भविष्यातील घडामोडींचा अंदाज देणारा एक संकेत असतो. कोणत्या नेत्यास कोणत्या वेळी असा सुविचार सुचतो आणि ‘राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो’ याचा साक्षात्कार होतो, त्यावरून त्या नेत्यांच्या भविष्यातील राजकारणाची पावले ओळखण्याचे कसब अनेकांना अनुभवाने साधलेले असते. अशा वाक्यांचा भडिमार सुरू झाला की भूकंप, वादळ किंवा उलथापालथ होणार, याविषयी राजकारणाच्या क्षेत्रात कोणतीही शंका नसते.
 
 
 
दोन वर्षांपूर्वी मे २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या काळात महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणातील शरद पवार या दीर्घानुभवी नेत्याने केलेल्या एका वक्तव्याची तेव्हा फारशी दखल घेतली गेली नव्हती; किंबहुना अशा वक्तव्यांकडे फारशा गांभीर्याने पाहावयाचे नसते, असेच अनेकांना वाटू लागले. काँग्रेसची आणि आमची विचारधारा एकच आहे, आम्हीही गांधी-नेहरूंच्याच विचारांचे आहोत आणि गांधी-नेहरूंची विचारधारा बळकट करण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन होणे हा एक मार्ग असू शकतो, असे शरद पवार यांनी एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. भाजपाविरोधी पक्षांची ताकद वाढविण्यासाठी भाजपाविरोधी मतांचे विभाजन टाळावे हा त्यांच्या या मताचा गाभा होताच; पण प्रादेशिक पक्षांना सातत्याने सत्तेबाहेर राहण्याची वेळ आल्यास त्यांची संघटनात्मक ताकद कमी होऊन अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही त्यांची भीतीदेखील होती. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणातील काही वादळे, भूकंप किंवा उलथापालथीचे आडाखे बांधण्यास सुरुवात झाली होती. शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, यावरच्या चर्चा रंगल्या होत्या. प्रगत विज्ञानाचे हवामानाचे आडाखेदेखील अनेकदा अचूक ठरत नाहीत, तेथे पठडीबाज परंपरांचे अंदाज तंतोतंत बरोबर येण्याची शक्यता नसते, हे खरेच असल्याने पवार यांच्या विधानानुसार तसे काही घडले तर नाहीच, पण माझा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असे काही मी म्हणालो नव्हतो, असे सांगून पवारांनी स्वतःच दिलेले बदलाचे संकेत धुडकावूनही लावले होते. तेव्हा त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि वादळापूर्वीची शांतता पुन्हा प्रस्थापितही झाली होती. काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळी चूल मांडणाऱ्या प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत पुनर्विचार करण्याकरिता प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पवार यांना तेव्हा ते वक्तव्य केले असावे, असेही म्हणतात. पण तेव्हा ती वेळ चुकली. पवार यांनी तेव्हा वर्तविलेल्या भाकितामधून उघड होणारे संकेत आता मात्र भविष्यातील वादळे, भूकंप किंवा उलथापालथीची चिन्हे उघड करताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची वाताहत झाल्यानंतर या पक्षाची ज्या झपाट्याने शकले उडू लागली, तेव्हा पुन्हा एकदा तृणमूलच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आणि त्याबरोबरच पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षाच्या भविष्याचे नवे आडाखेही बांधले जाऊ लागले आहेत. शरद पवारांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात काँग्रेस भुवनमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी घातलेला काँग्रेसचा गमछा आणि त्याप्रसंगानंतर उडालेले हास्यविनोदाचे कारंजे भविष्याच्या आडाख्यांस खतपाणी घालणारे ठरू पाहात आहे. शरद पवार हे शब्दाचे पक्के आहेत, असे मानले जाते. त्यांच्या तोंडून बाहेर पडलेला शब्द कधी माघारी जात नाही, अशीही त्यांची ख्याती आहे. उलट, आपल्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांचा विपर्यास होतो अशीच त्यांची अनेकदा तक्रार असते. त्यामुळे त्यांनी दोन वर्षांपूर्वी वर्तविलेल्या विलीनीकरणाच्या भाकितावरील त्यांचा विश्वास आजही ठामच असणार हे ओघानेच येते. यामुळेच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसप्रमाणेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या भवितव्याचे आडाखे आज बांधले जात असतील, तर ते अगदीच फोल ठरतील असे म्हणणे म्हणजे पवार यांच्या प्रदीर्घ अनुभवास दिले जाणारे आव्हान ठरू शकते.
 
 
तसे होणार नाही याची काळजी सध्याच्या राजकीय वातावरणानेच घेतली असावी असे दिसते. १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली त्याची कारणे वेगळी होती. पक्षनेतृत्वाविषयीच्या त्यांच्या काही भूमिकेमुळे त्यांना काँग्रेसने पक्षाबाहेरचा रस्ता दाखविला. त्यांनी स्वपक्षाची वेगळी चूल मांडली, पण त्यांनी गांधी-नेहरूंची विचारधारा सोडली नाही. तेव्हाही त्यांना भविष्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडींचा अंदाज आलाच असावा. पुढे तो तंतोतंत खरा ठरला, कारण पुढे लगेचच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी समान विचारधारेच्या जोरावरच त्यांचा पक्ष काँग्रेससोबत सत्तेसाठी तडजोड करू शकला आणि पुढे केंद्र सरकारातील सत्तेतही सहभागी होऊ शकला. अन्यथा, स्वबळावर कधीही सत्ता मिळवू न शकलेल्या शरद पवारांच्या पक्षास राजकारणात वळचणीला बसण्याची वेळ आली असती. ती तशी येऊ नये, यासाठी त्यांनी तेव्हा विचारधारेला धरून ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. भविष्यात आपण कधीही काँग्रेसमध्ये जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी वेगळ्या पक्षाची स्थापना करतानाच दिली होती, हे अनेकांस आठवत असेल. गेल्या काही दिवसांत मात्र काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांनी पुन्हा स्वगृही दाखल व्हावे आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपाविरोधी ताकद वाढवावी यासाठी काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू झाले आणि महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी शरद पवार गटाच्या विलीनीकरणाच्या संकेतास दुजोरा देण्यास सुरुवातही केली. यात भर म्हणून, सध्याच्या विरोधकांच्या राजकारणात दुय्यम स्थानावर असलेल्या उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही त्या चर्चेत हवा भरण्याचे काम केले आहे. असे काही संकेत मिळतात, तेव्हा राजकारणाच्या तंबूवर बसलेला वातकुक्कुट नव्या राजकीय वाऱ्यांच्या दिशेचा अंदाज घेत असतो हे उघड आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा वातकुक्कुट त्यांच्या राजकारणाचे काही वेगळेच संकेत देत आहेत. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाल्यानंतर आणि खासदारांच्या बैठकीतील हवा निघाल्यावर चर्चा सुरू झाल्यानंतर आता अयोध्येतील रामललाचे दर्शन घेऊन माफी मागण्याचे राऊत यांनी जाहीर केले आहे. त्यांचे हे वक्तव्यदेखील राजकारणाच्या नव्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांचे वेगळे संकेत असावे, असे आडाखे बांधले जात आहेत. तिकडे केंद्रात तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या खासदारांनी नव्या राजकारणाचे संकेत दिलेले असताना, महाराष्ट्रातील वातकुक्कुट अजूनही वाऱ्यांच्या दिशेचा अंदाज घेत असल्याने वादळ, भूकंप, पडझड यापैकी काहीतरी नक्की घडणार आहे, एवढेच भाकीत वर्तविणे तूर्तास सावधिगिरीचे ठरेल.