पानासारखी रचना, किड्यासारखा आकाराचा चिनी ड्रोन!

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
बीजिंग,
Insect-shaped Chinese drone युद्धभूमीवर ड्रोनचा वाढता वापर आता नव्या टप्प्यावर पोहोचत असल्याचे युक्रेन आणि इराणसारख्या संघर्षांमधून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर चीनने अत्यंत लहान आकाराचा “मायक्रो ड्रोन” विकसित करून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण केली आहे. चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनीतयार केलेला हा ड्रोन आकाराने डासासारखा आहे. त्याचे वजन फक्त सुमारे ०.३ ग्रॅम इतके असून, तो बाहेरून पाहता एखाद्या नैसर्गिक किड्यासारखा भासतो. या ड्रोनचे पंख पानासारख्या रचनेत तयार करण्यात आले असून त्याला अधिक वास्तववादी आणि नैसर्गिक रूप देण्यात आले आहे.
 
 
drone mosquito
 
या सूक्ष्म ड्रोनमध्ये अतिशय लहान सेन्सर्स बसवण्यात आले असून, त्याद्वारे फोटो काढणे, आवाज रेकॉर्ड करणे आणि डेटा संकलन करणे शक्य असल्याचे सांगितले जाते. आकार लहान असल्यामुळे तो रडारवर पकडला जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.त्याच्या क्षमतेमुळे हा ड्रोन खिडकीच्या छोट्या जागेतून किंवा अरुंद फटीतूनही प्रवेश करू शकतो, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांपुढे नवीन आव्हान निर्माण होऊ शकते. त्यामुळेच या तंत्रज्ञानाबाबत जगभरात प्रायव्हसी आणि सुरक्षेवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
 
 
तथापि, या तंत्रज्ञानास काही मर्यादाही आहेत. अतिशय कमी वजनामुळे बॅटरी आयुष्य मर्यादित आहे आणि हा ड्रोन केवळ काही काळच उड्डाण करू शकतो. तसेच वाऱ्याच्या तीव्र झोतामुळे त्याच्या दिशेत बदल होण्याची शक्यता असल्याने त्याची अचूकता प्रभावित होऊ शकते. या नव्या ड्रोनच्या चर्चेमुळे सोशल मीडियावरही मोठी प्रतिक्रिया उमटली असून, काहींनी त्याला भविष्यातील गुप्त निरीक्षण तंत्रज्ञानाचे उदाहरण म्हटले आहे, तर काहींनी वैयक्तिक गोपनीयतेवर धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे.