प्रत्येक घरात क्रीडा संस्कृती रुजणे गरजेचे : राज चौधरी

क्रीडा भारतीतर्फे वीर जिजामाता सन्मान सोहळा

    दिनांक :16-Jun-2026
Total Views |
वर्धा,
Raj Chaudhary भारतामध्ये विविध मैदानी खेळांसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध आहे. कबड्डी, कुस्ती आदी खेळ आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात क्रीडा संस्कृती रुजवणे आवश्यक असल्याचे मत क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी यांनी व्यत केले. क्रीडा भारती वर्धा तर्फे स्थानिक मुंडले परिसर येथे आयोजित वीर जिजामाता सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भरोसा सेलच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी वाघाडे होत्या.
 
 
Raj Chaudhary
 
राज चौधरी पुढे म्हणाले की, खेळ हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नसून मनाला उभारी देणारा आणि समाजात शिस्त निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे. जागतिक आरोग्य निर्देशांकात भारत अजूनही मागे आहे. यामागे संसाधनांचा अभाव नसून शारीरिक हालचालींचा अभाव आणि इच्छाशती कमी पडणे ही मुख्य कारणे आहेत, असे ते म्हणाले. आपल्या देशात मुलांना अतिजपण्याची वृत्ती असल्यामुळे त्यांच्यातील धाडस कमी होते. मुलांनी मैदानात घाम गाळला तर त्यांच्यात संघभावना, शिस्त आणि पराभव पचवण्याची ताकद निर्माण होते. आईने मुलांना संकटांचा सामना करू दिल्यास ते अधिक स्वावलंबी आणि निर्भय बनतात, असेही ते म्हणाले.
 
 
माधुरी वाघाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या नात्यातील निर्भयता आणि ध्येयवाद या पैलूंवर प्रकाश टाकला. केवळ शस्त्र हातात असून उपयोग नाही तर ते चालवण्याचे धैर्य आणि मनातील भीतीचा पूर्ण अभाव आवश्यक असतो. समाजातील तरुणांनी स्वतःचे आणि माता-भगिनींचे संरक्षण करण्यास सक्षम असावे, यासाठी प्रशिक्षण आणि संस्कार गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना बालपणापासूनच शस्त्र आणि शास्त्र यांचे शिक्षण देत स्वराज्याचे संस्कार दिले. खेळातून संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असेही त्यांनी सांगितले.
 
 
दरम्यान, या सोहळ्यात आपल्या पाल्यांना खेळासाठी प्रोत्साहन देऊन देशाचा गौरव वाढवणार्‍या रुपाली समीर खानोरकर, स्वाती करनाके, सुपिका सुनील शेंद्रे, संगीता विरूळकर, सुवर्णा सोनवणे आणि सोनाली तराळे या वीर मातांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला क्रीडा भारतीचे अध्यक्ष हरीष गांधी, सारंग परिमल, अमितप्रसाद, योगेश केळकर, प्रवीण खवशी, सुशील लोहिया, स्वप्नील पांडे, विलास वाघाडे, संदीप आपटे, अभिजित पारगावकर, भारती गोमासे, दीपाली हिंगणीकर, विशाखा जोशी, मनीषा मशानकर, रुपाली परदेशी, कविता कांबळे, प्रणिता गुल्हाने आदी उपस्थित होते.