नवी दिल्ली,
Kailash Mansarovar Yatra news कैलास मानसरोवर यात्रेला जाण्याची तयारी करणाऱ्या भाविकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यात्रेच्या नोंदणीच्या नावाखाली सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बनावट जाहिरातींचा सुळसुळाट झाल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, काही संकेतस्थळे आणि सोशल मीडिया पेजेस स्वतःला अधिकृत संस्था असल्याचे भासवून यात्रेच्या नोंदणीसाठी अर्ज स्वीकारत असल्याचा दावा करत आहेत. या माध्यमांतून भाविकांची आर्थिक आणि वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अशा कोणत्याही जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, कैलास मानसरोवर यात्रेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती आणि नोंदणी प्रक्रिया केवळ कैलास मानसरोवर यात्रा पोर्टल या संकेतस्थळावरूनच केली जाते. त्यामुळे इतर कोणत्याही वेबसाइट, एजन्सी किंवा सोशल मीडिया पोस्टद्वारे नोंदणीची ऑफर दिली जात असल्यास ती संशयास्पद मानावी, असे सांगण्यात आले आहे.सायबर गुन्हेगार धार्मिक भावना आणि यात्रेकरूंची उत्सुकता यांचा फायदा घेत बनावट संकेतस्थळे तयार करतात. नोंदणी शुल्क, प्रक्रिया शुल्क किंवा इतर कारणे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकजण अशा जाळ्यात अडकून आपली बँकिंग माहिती किंवा वैयक्तिक तपशील शेअर करतात आणि आर्थिक फसवणुकीचे बळी ठरतात.
कैलास मानसरोवर यात्रा ही हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेची आणि महत्त्वाची तीर्थयात्रा मानली जाते. भगवान शिवाचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैलास पर्वताचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक उत्सुक असतात. या यात्रेचे आयोजन केंद्र सरकारच्या देखरेखीखाली केले जाते आणि त्यासाठी निश्चित प्रक्रिया राबवली जाते. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास ती अधिकृत स्रोतांवरून पडताळून पाहण्याचे आवाहन केले आहे. तसेच संशयास्पद लिंक, संदेश किंवा जाहिरातींवर क्लिक न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.