श्रीनगर,
Landmine explosion near the LoC जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात लष्कराचे चार जवान जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी नौशेरा सेक्टरमधील सीमेवरील भागात नियमित गस्त घालत असताना ही दुर्घटना घडली. जखमींमध्ये एका ज्युनिअर कमिशन्ड अधिकाऱ्यासह (जेसीओ) तीन जवानांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यातील कलाल परिसरात लष्कराचे जवान नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यावेळी अचानक जमिनीत दबा धरून बसलेल्या भूसुरुंगाचा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच जवळील सुरक्षा पथके तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि जखमी जवानांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

जखमी जवानांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून बहुतेक जवानांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे.सीमेवरील सुरक्षेसाठी अनेक संवेदनशील भागांमध्ये भूसुरुंगांचा वापर केला जातो. मात्र मुसळधार पाऊस, भूस्खलन किंवा नैसर्गिक बदलांमुळे हे भूसुरुंग मूळ ठिकाणाहून हलण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा दुर्गम भागात गस्तीदरम्यान जवानांना अतिरिक्त सतर्कता बाळगावी लागते. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात तपास आणि शोधमोहीम सुरू केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसरातील संशयित भागांची पुन्हा तपासणी करण्यात येत असून सीमावर्ती भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.