विधान परिषद निवडणूक
अमरावती,
Legislative Council Election येथील विधान परिषद निवडणुकीत नेमके काय करायचे याबाबत अद्यापही स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतलेली नाही. मंगळवारी सकाळी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर संभ्रमावस्था कायम होती. काँग्रेसची भूमिका आता बुधवारी सकाळीच समोर येणार आहे.
काँग्रेसचा उमेदवार गेल्या आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असल्याने पक्षाच्या नेत्यांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता खासदार बलवंत वानखडे यांच्या कार्यालयात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार बलवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी आमदार राजकुमार पटेल, मिलिंद चिमोटे तसेच माजी आमदार वीरेंद्र जगताप उपस्थित होते.
बैठकीत निवडणुकीसाठी अवघे ४८ तास शिल्लक असताना काँग्रेसची भूमिका काय असावी, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नसल्याचे समजते. वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस पाठिंबा देणार की तटस्थ भूमिका घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी आपला उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला असून, ते सलग तिसर्यांदा विजयाची होतील, अशी स्थिती आहे. दरम्यान, काँग्रेसचा उमेदवार उपचार घेत असल्याने पक्षाच्या मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.