भंडारा,
massive fire at a cloth shop भंडारा शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजार पेठेत असलेल्या लालचंद कापड दुकानाला आज 16 रोजी अचानक भीषण आग लागली. धूर आणि आगीच्या ज्वाळामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. आजूबाजूला मोठाली दुकाने असल्याने त्यांचीही धाकधूक वाढली होती. अखेर अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कापड व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आज मंगळवार असल्याने बाजारपेठेतील बरीच दुकाने बंद होती. गांधी चौक ते बस स्थानकापर्यंत हा मुख्य बाजाराचा परिसर असून दोन्ही बाजूला मोठ मोठाली दुकाने आहेत. विशेष करून कपड्यांचे शोरूम आहेत. भारत फॅशन मॉल च्या शेजारी लालचंद फॅशन शोप नावाने मोठे जुने कपडाचे दुकान आहे. आज दुपारच्या सुमारास या दुकानातून धूर निघताना दिसला. काही वेळातच आगीच्या ज्वाळा बाहेर पडल्या. हा प्रकार पाहून लोकांनी आरडाओरड केली.
मोठी दुकाने बंद असले तरी लहान व्यवसायिकांनी आग लागल्याचे लक्षात येताच नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या दोन गाड्यानी तत्काळ घटनास्थळी येत आग विझविण्याचे काम सुरू केले. एक ते दीड तासानंतर कर्मचाऱ्यांना आग विझविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत कापड व्यवसायिकाची प्रचंड नुकसान झाले होते. आग लागल्याचे कळताच आजूबाजूच्या मोठ्या व्यवसायिकांची घाबरगुंडी उडाली कारण, सर्व दुकाने एकमेकांना लागून असल्याने कोणत्याही क्षणी आग इतरही दुकानांना कवेत घेण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन विभागाने दाखवलेली तत्परता मोठा अनर्थ टाळण्यात यशस्वी ठरली. मंगळवार सुट्टीचा दिवस असल्यानेही नुकसान कमी झाल्याचे समजते.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शॉर्टसर्किटने हा प्रकार घडला असावा अशी शक्यता आहे. दुकानात कपड्यांचा मोठा साठा असल्याने आग वेगाने पसरल्याचे सांगितले जाते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. मुख्य बाजारपेठेतच आग लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते हे मात्र खरे.